आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यापीठात ४० ते ७३% शुल्कवाढ; गरीब विद्यार्थ्यांसाठी दारे हाेणार बंद

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रशाळांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा दणका दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी ५२ टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ केली असून, विद्या परिषदेेने शुल्कवाढीवर शिक्कामोर्तब केले. व्यावसायिक वगळता अन्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. सर्वाधिक शुल्कवाढ ही सामाजिकशास्त्रच्या अभ्यासक्रमांत करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठात गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१४ प्रशाळांतर्गत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यापैकी नऊ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून ही वाढ लागू केली आहे. कोरोनात शुल्कवाढ केली नाही; परंतु कोरोनानंतर शुल्कवाढीचे पाऊल उचलले आहे.

अन्यायकारक शुल्क वाढ
महाविद्यालयाच्या शुल्कात प्रत्येक दोन वर्षांनी १० टक्के नैसर्गिक वाढ केली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक सहा वर्षांनी शुल्काचे सुसंगतीकरण करणे विद्यापीठ कायद्यात नमूद आहे. मात्र तरीदेखील यंदा काही अभ्यासक्रमात चक्क तीनपट शुल्कवाढ करण्यात आली. नैसर्गिक वाढ १० टक्के असताना सरासरी ५२ टक्क्याने केलेली शुल्कवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलांना शुल्कवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

दाेन वर्षांनंतर केली वाढ
विद्यापीठातर्फे दोन वर्षांपूर्वी शुल्कवाढ करण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे हे वाढीव शुल्क घेण्यात आले नाही. यंदापासून मात्र वाढीव शुल्कासह विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. एस. टी. इंगळे, प्र-कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...