आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवडीमोल भावामुळे 'फुलांचे झाले अश्रू':भर शेतात शेतकऱ्यांनी घातले बैल; 50 एकर पीक कोमेजले

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनापासून फुलांची शेती संकटात सापडली आहे. जिल्ह्यात फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिरसोलीत शिवारातही 50 एकरांत फूलशेती केली जाते. यात देखील अनेक शेतकऱ्यांनी मागणी व भाव अभावी या शेतांमध्ये गुरांना चारायला सोडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच गोलाणी मार्केटच्या मागील बाजूसदेखील फुलांना मागणी व भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी येथे मोठ्याप्रमाणात फुले टाकून काढता पाय घेतला.

फुलांचे नंदनवन असलेल्या शिरसोली शिवारात शेतकऱ्यांकडून 50 एकरांत फूल शेती केली जात आहे. मात्र, फुलांना असलेला कवडीमोल भाव व मागणीअभावी जडअंतकरणाने अनेक शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात बैल चारण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळी व दसऱ्यातही पाहिजेतसा भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांचा शेतापासून ते मार्केटपर्यंत फुले ने आण करण्याचाही खर्च निघत नाही. यंदा फुलांचा हंगाम तेजीत असला तरी शेतकऱ्यांकडून झेंडू 5 रुपये तर शेवंती 10 रुपये किलोने व्यापारी खरेदी करत असल्याने गोलाणी मार्केट परिसरात शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला 15 क्विंटल झेंडू व शेवंतीची फुले मार्केटपरिसरातच टाकून काढता पाय घेतला.

बाजारातील आर्थिक समीकरण चुकले ...

शहरात गोलाणी मार्केट हे फुलांचे मोठे मार्केट आहे. सकाळी येथे फुलांचा होलसेल बाजार भरतो. येथूनच शहरात आणि जिल्हाभरात फुले पोहोचली जातात. येथे शिरसोलीसह परिसरातून आजूबाजूचे शेतकरी फुले विक्रीसाठी येतात. यंदा फुलांचा हंबाम चांगला बहरला असला तरी फुलांना मागणीच नसल्याने भाव कोसळले आहेत. वाहतुकीचा खर्च आणि मजुरीही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गुरांना वाट मोकळी करून दिली आहे. बाजारातील आर्थिक समीकरण बिघडल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील फूल शेती कोमेजून शेतकरी हवालदील झाला आहे.

फुलांपेक्षा भाडेच अधिक ...

दररोज फुलांसाठी जळगावी येण्या-जाण्याचा खर्चच 200 रुपयांवर जातो. येथे येऊन 5 रुपये झेंडू तर 10 रुपये किलोने शेवंती विकावी लागत असल्याने येण्या - जाण्याचाही खर्च निघत नाही. नाशवंत माल असल्याने परत नेणेदेखील शक्य होत नाही. नेलाच तर खर्च अधिक वाढत असल्याने शेतकऱ्यांना माल फेकण्याशिवाय पर्याय नसल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्याने आपल्याकडील 15 क्विंटल झेंडू व शेवंती परिसरात फेकून येथून काढता पाय घेतला.

- विलास बोबडे, शेतकरी शिरसोली.

बातम्या आणखी आहेत...