आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधी अपघात योजना:वाढत्या महागाईमुळे विद्यार्थी अपघात अनुदानाच्या रकमेत 50% वाढ; प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी समिती

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सुधारणा केली आहे. 2013 पासून वाढलेली महागाई व विद्यार्थी अपघातांच्या वेगवेगळ्या स्वरुपामुळे या योजनेअंतर्गत अनुदानात 50% वाढ करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूसाठी आता 75 हजार रुपयांऐवजी 1 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल.

विद्यार्थ्यांसाठी योजना

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्यांमार्फत राबवण्यात येत होती. विमाकंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबाबत टाळाटाळ करत होत्या. काही प्रकरणांमध्ये उशीरही होत होता. त्यामुळे शासनाने विमा कंपन्यांमार्फत योजना बंद करुन त्या ऐवजी सानुग्रह अनुदान योजना झाली. त्याऐवजी सरकारतर्फे सानुग्रह अनुदान योजना नियमित स्वरुपात राबवण्यात येत आहे.

2013 पासून वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांच्या अपघातांचे वेगवेगळे स्वरुपाच्या अनुषंगाने योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जखमी किंवा मृत विद्यार्थ्याला अनुदान मिळण्यासाठी पालक व शाळेला जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.

सुधारित अनुदान

विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू 1 लाख 50 हजार, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (दोन अवयव,एक डोळा निकामी) 1 लाख, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव किंवा 1 डोळा कायम निकामी) 75 हजार, विद्यार्थ्याला अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये, विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास 1 लाख 50 हजार, विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, वीजेचा धक्का, वीज अंगावर पडून) 1 लाख रुपये.

निकषांमध्ये वाढ

योजनेत सुधारणा करण्यापूर्वी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. अपघातामुळे अपंगत्व (दोन अवयव, डोळे किंवा एक अवयव निकामी) आल्यास 50 हजार रुपये तर अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव किंवा 1 डोळा निकामी) आल्यास 30 हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. जुन्या निकषानुसार या तीनच अपघातांच्या बाबींसाठी अनुदान दिले गेले. आता 50 % अनुदान वाढवण्यासह अपघातांच्या तीन नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...