आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव शहरात पाचव्या रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणीच्या हालचालींना गती आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सुरत रेल्वेगेटवर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. आरआेबीसाठी रेल्वे प्रशासनाने ड्राॅइंग तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. एप्रिलपर्यंत मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी सुमारे ४२ काेटी खर्च अपेक्षित आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर पुढच्या वर्षभरात पिंप्राळा रेल्वेगेट व आसाेदा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण हाेणार आहे. दाेन्ही पुलांचे काम प्रगतिपथात असताना शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील शिवकाॅलनीजवळील उड्डाणपुलाला ‘न्हाई’ने मंजुरी दिली आहे. त्यापाठाेपाठ आता सुरत रेल्वेगेट भविष्यात बंद करण्याच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलासाठी प्रस्ताव तयार करून मंजुरीच्या प्रक्रीयेसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
महिनाभरापुर्वी प्रस्ताव रवाना : शिवाजीनगरातून दूध फेडरेशनमार्गे निमखेडीकडे जाणाऱ्या मार्गावर सुरत रेल्वेगेट आहे. शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना या गेटमधून हाेणारी वर्दळ कमालीची तापदायक ठरली हाेती. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची नितांत गरज आहे. भविष्यातील वर्दळ लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महिनाभरापुर्वीच आरआेबीसाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. रेल्वे व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सम प्रमाणात पुलाच्या कामासाठी खर्च केला जाईल.
शिवकाॅलनीजवळ पुलाचे काम दिवाळीपर्यंत : महामार्गावरील ब्लॅक स्पाॅट ठरलेल्या शिवकाॅलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे कामाला ‘न्हाई’च्या दिल्ली कार्यालयाने गेल्या महिन्यात मंजुरी दिली आहे. या पुलासाठी गेल्या आठवड्यात ड्राेनने सर्वेक्षण करण्यात आले आहे. नागपूर येथील टर्नेजी प्राेपुलेशन या संस्थेने केलेल्या पाहणीनंतर डिझाईन तयार केले जाईल. त्याला जूनपर्यंत मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे शिव काॅलनीतील पुलाच्या कामासाठी जुलैत निविदा प्रक्रीया राबवली जाणार आहे. या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात दिवाळीत सुरूवात हाेवू शकते. आताच्या पुलाएवढीच लांबी व रूंदी असली तरी भराव करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे पिअर्स वाढवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘एस’ आकाराचा पूल उभारण्यात येणार
शिवाजीनगरातून निमखेडी रस्त्यापर्यंत उभारण्यात येणाऱ्या उड्डाण मार्गाचा आकार ‘एस’ असेल. ७०० मीटर लांब व साडे आठ मीटर रुंदीचा हा उड्डाण पूल उभारला जाईल. यासाठी सुमारे ४२ काेटींचा खर्च हाेणे अपेक्षित आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वेकडून एजन्सी नियुक्त करून पुढची प्रक्रिया हाेईल. मंजुरीला एप्रिल ते मे महिना उजाडू शकताे.
सात हजार वाहनांचा दरराेजचा आहे वापर
शिवाजीनगरकडून व निमखेडीकडून दरराेज सरासरी सात हजार वाहनांची ये-जा सुरू असते. सुरत मार्गावर दरराेज सरासरी ३७ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे दिवसभरात ३७ वेळा रेल्वेगेट बंद करावे लागते. या गेटमधून दरराेज वाहनांशिवाय हजाराेंच्या संख्येने पादचारी प्रवास करीत असतात. पुलाचे काम झाल्यास हजाराे नागरिकांची गैरसाेय दूर हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.