आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:शिवकाॅलनीतील 100 फूट रुंद रस्ता दहा वर्षांत फक्त 100 मीटर झाला; खर्चात अडीच पट वाढ

चरणसिंग पाटील | जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिंताजनक प्रश्न राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा परिणाम, पाठपुरावा गरजेचा

गेल्या दहा वर्षांत महानगरपालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या उदासीनतेने शिवकाॅलनीतील १०० फूट रुंदीचा राेड शंभर मीटरच्या पुढे डांबरीकरण हाेऊ शकलेला नाही. वाढलेले भाव अन् शासकीय दरांमुळे भूसंपादनासाेबत रस्ता मजबुतीकरणासाठी लागणाऱ्या खर्चात अडीचपट वाढ झाली आहे.

शिवकाॅलनीपासून ते वाघनगर घाटाकडून थेट माेहाडी राेडला जाेडणाऱ्या या रस्त्याचे काम रखडले आहे. शिवकाॅलनीजवळील हाॅटेल व पेट्राेलपंपापासून ३०० मीटर रस्त्यावरील जागा भूसंपादनासाठी प्राथमिक पाहणी व्यतिरिक्त प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे पाच वर्षांसाठी सुमारे दहा ते पंधरा काेटींचा लागणारा खर्च मनपाला आगामी काळात १५ ते २० काेटींपेक्षा जास्त करावा लागणार हे निश्चित.

दरवाढीचा मनपाच्या तिजाेरीवर पडेल भार
शासकीय कामांसाठी जाहीर दरसूचित दरवर्षी १० ते १२ टक्के वाढ हाेते. महामागाईचा फटका विकास कामांना बसाे. गेल्या दहा वर्षांत १०० फुटी रस्त्याच्या कामाबाबत सत्ताधारी असाे की प्रशासनाकडून उदासीन भूमिका घेण्यात आली. त्यामुळे त्याचा खर्च अडीच पट वाढेल.

अडीच किलाेमीटर अंतराचा फेरा टळणार
खाेटेनगर, पिंप्राळा, निमखेडी, गणेश काॅलनी भागातून पाचाेरा जाणाऱ्याांना सध्या आकाशवाणी, इच्छादेवी चाैकाकडून प्रवास करावा लागताे. रायसाेनी काॅलेजपर्यंत जाण्यासाठी सहा ते सात किमी प्रवास करावा लागताे; परंतु या रस्त्यामुळे अडीच किमीचा फेरा वाचणार आहे.

...तर अडीच पट रक्कम माेजावी लागणार
शिवकाॅलनीतील बाधित हाेणारी २६ बांधकामे व खासगी जागांचे भूसंपादन करायचे झाल्यास मनपाला अडीच पट रक्कम माेजावी लागेल. हा आकडा १५ काेटींपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. रेडी रेकनरनुसार शिवकाॅलनीत निवासी बांधकामासाठी ३१७९० प्रति चाैरस मीटर तर खुल्या जमिनींसाठी ८ हजार ७९० रुपये प्रतिचाैरस मीटर दराने पैसे अदा करावे लागतील.

आठ काेटींचे अंदाजपत्रक
काेल्हेनगरपासून ते रामानंद घाटापर्यंत तसेच घाटापासून ते पठाणबाबा दर्ग्यापर्यंत रस्त्याच्या कामासाठी प्रत्येकी साडेचार काेटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. एक प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे तर दुसऱ्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यात रस्त्याचे डांबरीकरण, दाेन्ही बाजूने काँक्रीटच्या गटारी व दुभाजक अशी कामे प्रस्तावित आहेत असे सांगण्यात येते आहे.

बातम्या आणखी आहेत...