आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कविता समूह मनाचा आविष्कार असते ; मसाप’ जामनेर शाखेच्या व्याख्यानात कवी नालट यांचे मत

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कविता एकट्याचा संदर्भ घेऊन कधीही व्यक्त होत नसते, ती समूह मनाचा आविष्कार असते. माझ्या कवितेचे संदर्भ पोखरून पाहताना समाजाने मलाही उलगडून बघावे, असे मत अमरावतीचे कवी पवन नालट यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पुणे) जामनेर शाखेने रविवारी आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ‘माझ्या कवितेची वाटचाल’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. साहित्याचे शस्त्र हे जातीपाती, संघर्ष, शोषणाच्या विरुद्ध वापरले गेले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. नुकताच त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) शाखा पाचोराच्या वतीने देण्यात येणारा कै. प्राचार्य किसनराव पाटील राज्य वाङ‌्मय पुरस्कार जाहीर झालेला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संदीप माळी यांनी केले. वाचकांची अभिरुची विकसित व्हावी आणि उत्तम साहित्यकृतींची माहिती तसेच उत्तम दर्जाच्या कलाकृतींचा आस्वाद सर्वांना घेता यावा या उद्देशाने ‘नवे अक्षर’ ऑनलाइन व्याख्यानमाला सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी कादंबरीकार डॉ. अशोक कौतिक कोळी होते. कवी पवन नालट यांच्या कवितेतून समकालाला दिलेल्या प्रतिक्रिया निश्चित अक्षर वाङ‌्मय म्हणून ओळखल्या जातील. सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या जगतातून प्रवास करणारी पवन नालट यांची कविता ही भवतालचा वेध घेणारी कविता आहे, असे प्रतिपादन त्यांनी समाराेपसत्रात केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सदस्या स्नेहल पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमास डॉ. वासुदेव वले, डॉ. फुला बागुल, कवी रावसाहेब कुंवर, कवी वीरभद्र मिरेवाड, नाना लामखेडे, कवी नामदेव कोळी इत्यादी मान्यवर ऑनलाइन उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. कांचन महाजन यांनी मानले.

‘मी संदर्भ पोखरतोय’ काव्यसंग्रहातील कवितांना दाद समकालीन वास्तवात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अंगाला भेटणाऱ्या निरनिराळ्या अवस्थांच्या कविता पवन नालट यांनी लिहिल्या आहेत. त्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या त्यांच्या काव्यसंग्रहात प्रकाशित झाल्या आहेत. त्यातील निवडक कविता त्यांनी या व्याख्यानात सादर करून त्या लिहिण्याच्या मागची कारणे सांगितली. आजी कविता सादर करताना त्यांना गहिवरून आले होते. साध्या, साेप्या भाषेत त्यांनी प्रवास उलगडला.

बातम्या आणखी आहेत...