आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुपोषणामुळे झाला कनीजचा मृत्यू:आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल; जेवण न देता घरातच डांबले; गेल्या 2 वर्षांपासून सतत केली मारहाण

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचनाम्यासाठी कबर उकरतांना. - Divya Marathi
पंचनाम्यासाठी कबर उकरतांना.
  • मृतदेह कबरमधून बाहेर काढून केले शवविच्छेदन

पिंप्राळा हुडकोतील कनीज फातेमा शेख जावेद अख्तर या ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचे बुधवारी समोर आले आहे. अपशकुनी असल्याचे समजून गेल्या २ वर्षांपासून कनीजला सतत मारहाण केली, अपूर्ण जेवण दिले, अंघोळ करू न दिल्याने शारीरिक व्याधी जडवू दिल्या. याच कारणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बुधवारी तिच्या निर्दयी आई व वडिलांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेत थेट आई-वडिलांनी स्वत:च्या मुलीचे हाल हाल करून तिला मरणाच्या दारात सोडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता हुडको येथील राहत्या घरात कनीजचा मृत्यू झाला. शेख दांपत्याने कोणास काही एक न सांगता दुसऱ्याच दिवशी सकाळी तिचा दफनवीधी उरकून दोघे बेपत्ता झाला होते. या सर्व प्रकरणाचा संशय आल्यानंतर कनीजचा मामा अजहर व नाना-नानी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर २६ एप्रिलपासून पोलिस चौकशी करीत आहेत.

बुधवारी कनीजचा मृतदेह कबरमधून बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. वैभव सोनार यांच्यासह पथकाने या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, कनीजच्या पोटात अन्न-पाणी नव्हते. कुपोषण, भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. दरम्यान, कनीजची आई, नाजिया परवीन हिला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली होती. तिने दिलेल्या जबाबानुसार, कनीजच्या जन्मानंतर तिची आजी (जावेद अख्तरची आई) हिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर दोन वर्षांनी जावेदच्या मेडिकल दुकानास आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनांमुळे जावेद याने कनीजला अपशकुनी असल्याचा समज करून घेतला. तेव्हापासून तो कनीजला मारहाण करीत होता. ही घटना माहिती पडल्यानंतर तिचा मामा अजहर व नाना-नानी यांनी तिला स्वत:कडे राहण्यास नेले. तिला शाळेत दाखल करून तिचे शिक्षण सुरू केले. काही वर्षे नाना-नानीकडे राहिल्यानंतर कनीज अभ्यासात हुशार झाली हाेती. यानंतर फेब्रुवारी २०१९मध्ये जावेद याने भांडण करून पुन्हा एकदा कनीजला स्वत:च्या घरी नेले.

मृतदेह कबरमधून बाहेर काढून केले शवविच्छेदन
कनीजच्या मृत्यूनंतर तिच्यावर दफनविधी करून जावेद व त्याची पत्नी जळगावातून बेपत्ता झाले होते. बुधवारी मृतदेह कबरमधून बाहेर काढून शवविच्छेदन केल्यानंतर सर्व प्रकार उजेडात अाला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कनीजचे वडील जावेद व आई नाजिया परवीन यांच्या विरुद्ध कलम ३०४, ३२३, ५०६, २०१, २०२, ३४ व बाल न्याय अधिनियम २०१५ चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.अंघोळदेखील करु न दिल्याने डाेक्यात उवा
शेख दांपत्याने कनीज हिला अनेक दिवसांपासून अंघोळदेखील करू दिली नव्हती. त्यामुळे तिच्या डोक्यात उवा पडल्या होत्या. मृत्यूनंतर तिची अंघोळ करताना डोक्यातून उवा व चिकट द्रव बाहेर पडत होते. मृत्यूपूर्वी ती रांगत असल्यामुळे गुडघ्यावरील कातडी निघालेली होती. तसेच कनीज अत्यंत कमजोर झाली होती, असे मृत्यूनंतर तिची अंघोळ घालणाऱ्या परवीनबी शेख रफिक यांनी पोलिसांना सांगितले.


बातम्या आणखी आहेत...