आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या किती तीव्र आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. १५ महिन्यांत शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या ५६५७ घटना घडल्या. त्या तुलनेत मांजराने चावा घेतल्यामुळे उपचार करवून घेण्यासाठी ११७ जण रुग्णालयापर्यंत पोहोचले आहेत.
त्यांनी मनपाकडे तक्रार केलेली नाही. म्हणजे यातील बहुतांश मांजरी पाळीव असण्याचीच शक्यता आहे. मांजरींची संख्या कुत्र्यांच्या तुलनेत कमी आहे, तसेच त्यांचा आकारही लहान आहे. पण त्यांच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च मात्र कुत्र्यांपेक्षा दुपटीहून अधिक आहे.
मंगळवारच्या महासभेत येतोय शासकीय प्रस्ताव
एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणास मनपा ९३८ रुपये खर्च करते. मांजरीसाठी मात्र तोच खर्च २००० रुपये होणार आहे. जळगाव जळगाव शहरात किती भटक्या मांजरी आहेत, याची कोणतीही आकडेवारी महानगरपालिकेकडे नाही. वर्षभरात मांजर चावल्यामुळे उपचारासाठी जाणाऱ्यांची संख्या केवळ ११७ आहे. त्यापैकी एकानेही तक्रार केलेली नसल्यामुळे चावलेल्या मांजरी या पाळीव असण्याचीच शक्यता अधिक आहे. तरीही येत्या महासभेत भटक्या मांजरींचे निर्बिजीकरण करण्यासाठी प्रत्येक मांजरीमागे दोन हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.
भटक्या कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या निर्बिजीकरणाची माेहीम राबवावी, असे निर्देश थेट राज्य शासनाने जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असल्यामुळे प्रशासनाने एक प्रस्ताव महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेसमोर सादर केला आहे.
त्यात एका भटक्या मांजराच्या निर्बिजीकरणावर दोन हजार रुपये खर्च येईल, असे नमूद करण्यात आले आहे. महासभेत पदाधिकारी आणि नगरसेवक या विषयावर काय भूमिका घेतात, यावर या कामावर सर्वसामान्य जळगावकरांचा किती पैसा खर्ची पडतो, हे ठरणार आहे.
तज्ज्ञ म्हणतात मांजरापेक्षा कुत्रा धाेकादायक
पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलिंद पाटील व पशुपापा असाेसिएशनच्या अध्यक्षा खुशबू श्रीश्रीमाळ यांच्या म्हणण्यानुसार कुत्रा एकाच ठिकाणी राहताे मात्र मांजर ही जागा बदलत असते. मांजराने चावा घेण्याच्या घटनाही खुपच कमी असतात. त्यामुळे प्रशासनाने आधी कुत्र्यांची संख्या कमी करावी.
घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे
घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे अशी एक म्हण मराठी भाषेत प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्यय मनपाला या नव्या शासकीय आदेशाने येतो आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महापालिका अनेक वर्षांपासून लाखो रुपये खर्च करते आहे. पण अजूनही ही समस्या कायम आहे . त्यातच सरकारकडून हा नवा आदेश आला असून प्रशासनाने तो चेंडू महासभेच्या कोर्टात ढकलला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.