आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकाळी सकाळी नाष्टा करण्याची इच्छा झाली की आठवतात ते कचोरी, समोसा. कमी खर्चात पोट भरेल असा हा पदार्थ असल्याने साऱ्यांनाच आवडणारा. दररोज सकाळी साडेसहापासून जळगाव शहरातील सुभाष चौकातील विजूभाऊ कचोरी सेंटर अर्थात चेतन चाट याठिकाणी शेकडो लोक नाष्टा करण्यासाठी येत असतात. कचोरीचा सुटणारा घमघमाट आणि वर्षानुवर्षापासून असणारी एकच चव हे यांचे वैशिष्ट्य... त्यामुळे ही कचोरी नेमकी कशी तयार करतात हे पाहण्यासाठी ‘मेकिंग ऑफ कॉलम’च्या निमित्ताने आम्ही पोहोचलो थेट कचोरी सेंटरला. मध्यरात्री २ वाजता जेव्हा लोक गाढ झोपेत असतात. तेव्हा राजपूत कुटुंबीय दररोज उठून आपल्या व्यवसायाच्या कामाला सुरुवात करतात. घरातील लहानांसह मोठे असे सहा लोक कचोरी, समोसा तयार करण्याच्या कामात मदत करत असतात. इतरांना त्रास होऊ नये म्हणून घराच्या गच्चीवर हे काम सुरू असते. यासाठी बाजूला एक खोलीही तयार करण्यात आली आहे. विजय (विजूभाऊ) राजपूत सांगत होते की, आदल्या दिवशी कामे करून ठेवणे आम्हाला आवडत नाही. जी चव ताज्या भाज्या चिरून बनवण्यात आहे ती शिळ्या भाज्यांना येत नाही. त्यामुळे आम्ही रात्री २ वाजता उठल्यानंतर मिरची, पुदिना चिरण्यासह बटाटे उकडण्याच्या कामाने सुरुवात करतो. घरातील महिला व मुले आम्हाला या कामात मदत करतात. आमच्या आजोबांनी म्हणजेच अमरसिंग राजपूत यांनी १९६० साली या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांच्याकडून वडिलांनी कला शिकली. काका मनोहर राजपूत व वडील सुरेश राजपूत यांनी १९८० साली दोन शिफ्टमध्ये व्यवसाय वाढवला. सकाळी कचोरी, समोसा व दुपारी नाष्टा याठिकाणी विक्री करण्यात आला. ३८ वर्षांपासून घरातील तिसरी पिढी या व्यवसायात आली. विजूभाऊ हे सकाळी ११ वाजेपर्यंत व्यवसाय चालवतात तर दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत चेतन राजपूत हे व्यवसाय करतात. दोन्ही भावांनी वडिलांकडूनच रेसीपी शिकली असल्याने चव आजही तीच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.