आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप बाहेर काढण्यात यश:सात दिवसांपासून १६० फूट खोल विहिरीत पडलेल्या सापाला जीवदान

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भक्ष्याचा शोधात १६० फूट विहिरीत पडलेल्या सापाला सोमवारी सर्प मित्रांनी बाहेर काढले. हा साप सात दिवसांपासून विहिरीत पडलेला होता. सहा तास प्रयत्न करुन दोरी बांधून सर्पमित्र थेट विहिरीत उतरल्यानंतर हा साप बाहेर काढण्यात यश आले. जळगाव तालुक्यातील भोकर, भादली येथील ही घटना घडली. शेतकरी अनिल मुरलीधर पाटील यांच्या विहिरीत २९ ऑगस्ट रोजी एक व्यक्ती पाण्याची मोटार काढण्यासाठी उतरला होता. यावेळी विहिरीत साप असल्याचे आढळून आले. विहिर १६० फूट खोल असल्यामुळे तो व्यक्ती मोटार बाहेर न काढता स्वत:चा जीव वाचवून बाहेर पडला. दरम्यान, साप पाच ते सहा फुटाचा असल्यामुळे नंतर विहिरीत कोणीही उतरायला तयार झाले नाही.

अखेर दोन दिवसांपूर्वी वन्यजीव संरक्षण संस्थेचे कानळदा येथील सर्पमित्र दिनेश सपकाळे यांना बोलावण्यात आले. सपकाळे यांची काही सहकाऱ्यांसह दोन दिवस प्रयत्न केले. तरी देखील साप बाहेर येऊ शकत नव्हता. अन्न मिळत नसल्यामुळे साप अशक्त होऊन मृत होण्याचाही धोका वाढला होता. सोमवारी सपकाळे यांच्यासह नाना सपकाळे, चेतन भावसार व ऋषी राजपूत या सर्व सर्प मित्रांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केले. चेतन भावसार यांना दोरी बांधून सुरक्षितपणे विहिरीत उतरवण्यात आले. काही अप्रिय घटना घडू नये म्हणून सोबत गावातील काही तरुण देखील मदतीला आले होते. दोरीच्या मदतीने भावसार विहिरीत उतरले. त्यांनी अलगदपणे सापाला ताब्यात घेऊन बाहेर काढून, त्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

बातम्या आणखी आहेत...