आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून ​​​​​​​संशोधन:कायद्याच्या शिक्षणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्ञान कमी, सर्वेक्षणातून निघाला निष्कर्ष

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापूर्वीच म्हणजेच वयाच्या 18 व्या वर्षी तरुण-तरुणींना मतदानाचा अधिकार मिळालेला असतो. यानंतर त्यांना सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात शिक्षण, नोकरीच्या संधी मिळतात. यावेळी स्वत:च्या सुरक्षीततेसाठी त्यांना कायद्याचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. परंतु, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान कमी आहे, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत एका विद्यार्थ्याने पोर्स्टरच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन निष्कर्ष काढला आहे. त्यासाठी त्याने विविध महाविद्यालयातील सुमारे 500 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आहे.

एखाद्या कायद्याची अंमलबजावणी हाेताच प्रत्येक नागरीकास त्या कायद्याचे ज्ञान आहे असे मानले जाते. परंतु, कायदा माहित नाही, ज्ञान नाही असे संरक्षण कायद्याने घेता येत नाही. म्हणूनच खास करुन विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा प्रस्तावनेने हे सर्वेक्षण केले गेले आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी कायद्याचा अभ्यास करणे, जनजागृती निर्माण करणे, भीती कमी करुन मनोबल वाढवणे, कायद्याबद्दल विश्वास व जाणीव निर्माण करणे असे या सर्वेक्षणाचे उदीष्ट होते. संशोधनासाठी सर्वेक्षण पद्धतीचा वापर करुन सुमारे 500 विद्यार्थ्यांना अचानकपणे भेटून कायद्यांच्या बाबतीत दहा प्रश्न विचारण्यात आले.

या प्रश्नावलीची विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांची टक्केवारी काढली गेली. यात विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक असलेल्या कायद्यांच्या बाबतीत ज्ञान कमी असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी कायद्याविषयी ज्ञान देण्यासाठी व्याख्याने, स्पर्धा घ्याव्या. पोलिसांची मदत घेऊन विद्यार्थी, पालकांना कायद्याचे ज्ञान द्यावे. अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

85 टक्के विद्यार्थ्यांना सायबर क्राईम माहित नाही

सायबर क्राईम म्हणजे काय? असा एक प्रश्न विचारला गेला होता. यात सुमारे 85 टक्के विद्यार्थ्यांनी नकारात्मक उत्तरे दिली. म्हणजेच केवळ 15 टक्के विद्यार्थ्यांना सायबर क्राईम बद्दल माहिती आहे. सध्या तरुण-तरुणींना फसवणे, आर्थिक लुट या सारखे गंभीर गुन्हे मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. म्हणजेच सायबर क्राईम बोकाळत असताना विद्यार्थ्यांना सायबर क्राईम बद्दल ज्ञान नसणे ही गंभीर बाबही या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

बेकायदेशीर असल्याची जाणीव प्रत्येकाला हवी

ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले की, कायदा माहित नाही, ज्ञान नाही असे सांगत बचाव, संरक्षण घेता येत नाही. कायद्याची ज्ञान नाही हा गुन्हा नाही पण, आपण केलेले कृत्य कायदेशीर आहे की बेकायदेशीर याची जाणीव प्रत्येकालाच माहिती असणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...