आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:श्रमिक एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या तरुणाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू; मृत मध्य प्रदेशातील रहिवासी

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेळापत्रक नसल्याने जळगावात रेल्वेमार्गावर वाहतूक कोंडी, एक्स्प्रेस दिवसभर उन्हात होती उभी

मुंबईहून सुटलेल्या श्रमिक एक्स्प्रेसमधील २० तासांच्या वेदनादायी प्रवासात अन्न-पाणी न मिळाल्यामुळे प्रकृती खालावून मध्य प्रदेशातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २२ मे रोजी रात्री घडली. कोरोनाची लक्षणे असल्याच्या संशयावरून त्याचा व्हिसेरा राखीव ठेवून तपासणीस पाठवला आहे. रामकुमार प्यारेलाल निर्मल (२६, रा. पुरे टिकाराम, जि. प्रतापगड, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मोठा भाऊ व सहकाऱ्यांसोबत मुंबईत मजुरी करीत होता.

रेल्वे दिवसभर उभी :

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने रामकुमार २१ रोजी रात्री १० वाजता श्रमिक एक्स्प्रेसने भाऊ आणि सहकाऱ्यांसह मूळ गावी निघाला होता. ते सुमारे २० तासांच्या प्रवासानंतर घरी पोहोचणे अपेक्षित होते; परंतु रेल्वेमार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे ही एक्स्प्रेस २२ मे रोजी पाचोरा, गाळण, नगरदेवळा, शिरसोली, भादली स्थानकांवरच उभी होती. दुपारच्या तीव्र उन्हात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. यातच त्यांना जेवण, पाणीदेखील मिळाले नाही.

लोको पायलटकडे मदतीची याचना

प्रवाशांनी सोबतच्या थोड्याफार अन्न-पाण्यावर २१ मेची रात्र काढली. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रचंड हेळसांड झाली. त्यातच ही रेल्वे जळगाव स्थानकावर न थांबल्यामुळे अडचणी अधिकच वाढल्या. या वेदनादायी प्रवासात दुपारपासून रामकुमार याची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली होती. रेल्वे भादली स्थानकावर ३ तास उभी होती. रामकुमारच्या भावाने थेट लोको पायलटकडे जाऊन मदतीची याचना केली. परंतु भुसावळ स्थानकावर पोहोचल्यानंतरच मदत मिळू शकेल, असे उत्तर देण्यात आले.

भुसावळमध्ये उपचारादरम्यान मृत्यू : 

अखेर ही रेल्वेगाडी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचली. तोपर्यंत रामकुमार याची प्रकृती अधिकच खराब झाली होती. या ठिकाणी रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू झाल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

राज्यातील रेल्वेमार्गांवर गर्दी, प्रवाशांचे अतोनात हाल

देशभरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना रेल्वेने आपापल्या गावी पाठवले जाते आहे. नियमित वेळापत्रकाशिवाय निघालेल्या या रेल्वेगाड्यांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रेल्वेगाड्या थांबून आहेत. नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी २-३ दिवस उशीर होत आहे. प्रवाशांना अन्न-पाणीही उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा वेदनादायी प्रवास प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे.

कोरोनाच्या संशयावरून व्हिसेरा तपासणीसाठी

रामकुमार याला दुपारपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. यातच त्याला पिण्यासाठी पुरेसे पाणीदेखील मिळाले नाही. त्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार व्हिसेरा राखीव करण्यात आला. हा व्हिसेरा धुळे येथे तपासणीस पाठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...