आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सालदाराचा मुलगा ते साहित्य अकादमी पुरस्कार विजेता

जळगाव / सुधाकर जाधवएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव जिल्ह्यातील एरंडोलचे रहिवासी असलेले आबा गोविंदा महाजन यांचा गौरव

जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमध्ये सालदाराच्या घरात जन्मलेल्या आबा गोविंदा महाजन यांनी शिक्षक, नायब तहसीलदार ते तहसीलदार पदापर्यंत मजल मारली. त्यांनी बालसाहित्यात राज्य पुरस्कारांची हॅट््ट्रिक केल्यानंतर “आबांची गोष्ट’ या कथासंग्रहावर बालसाहित्यातील साहित्य अकादमीची मोहोर उमटली. शिक्षक असताना साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा लळा लागल्यानंतर बालसाहित्य लिहिण्याचे मनी ठाणले. वेगळ्या प्रयोगाची दखल निश्चित घेतली जाईल, असे वाटायचे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या, जिद्दी मुलांच्या या कथांची दखल घेतल्याचे मनस्वी समाधान वाटत असून त्याचे श्रेय खान्देशातील मुलांना असल्याचे साहित्यिक तथा तहसीलदार आबा महाजन “दिव्य मराठी’ला सांगत होते. त्यांच्याशी झालेला संवाद त्यांच्यात शब्दांत...

एरंडोलमध्ये सालदाराच्या कुटुंबात माझा जन्म झाला. “आबांची गोष्ट’मधील १७ कथांपैकी निम्म्या कथा एरंडोलच्या वातावरणातील, खान्देशी बोलीत आहेत. प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. नोकरी लवकर मिळण्यासाठी त्यांनी डी.एड.केले. जामनेर व एरंडोल तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. तेथे साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई चाैधरी यांच्या साहित्याचा लळा लागला. स्वत:ही मुलांसाठी लिहावे, असे वाटू लागले. तेथून बालसाहित्याचा प्रवास सुरू झाला. सन १९९३-९४ मध्ये पहिली कविता किशोर मासिकात प्रसिद्ध झाली. सन २००१ मध्ये “गमतीच्या राज्यात’ हे पहिले पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाले. त्यालाही अनेक पुरस्कार मिळाले. खान्देशात ना.धों.महानोर, अशोक कोतवाल यांच्यानंतर राज्य शासनाचा पुरस्कार मिळवणारा मी तिसरा साहित्यिक. राज्य शासनाच्या पुरस्कारांची हॅट‌्ट्रिक झाली. सन २००८-९, २०१०-२०११, २०१३-१४ असे तीन पुरस्कार बालसाहित्यात बालकवितेमध्ये मिळाले. सन २०१० मध्ये नायब तहसीलदार झालो. तोपर्यंत पारंपरिक, साचेबद्ध पद्धतीने बालसाहित्य लिहीत होतो.

बालसाहित्यामध्ये प्रयोग करणे आवश्यक असल्याचे सन २०१० मध्ये वाटू लागले. तोचतो प्रकार मुले वाचत नाहीत. प्रयोग करायला सुरुवात केली. “मन्हा मामानं गावले जावू’ या पुस्तकात अहिराणी, मराठी असा द्विभाषिक प्रयोग केला. त्याला राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार मिळाला. मन्हा गावले अहिराणी बोलीतील पुस्तक प्रकाशित झाले. आबांची गोष्ट हा कथासंग्रह प्रमाणभाषेतील असला तरी खान्देशी बोलीतील शब्द पेरले आहेत. मुले सहज वाचतील अशा त्या कथा आहेत. हा कथासंग्रह वाचल्यानंतर बाबा भांड, राजन गवस यांच्या प्रतिक्रिया आल्या. खुद्द भालचंद्र नेमाडे यांनी फोन केला. पुस्तक वाचले व आवडल्याचे सांगितले.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘मन्हा मामानं गावले जावू’ पुस्तकाचा समावेश
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.ए.साठी “मन्हा मामानं गावले जावू’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला. मन्हा गावले या पुस्तकाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला. बालसाहित्यात प्रयोग करणार असाल, वेगळं लिहिणार असाल तर त्याची शंभर टक्के दखल घेतली जाते, याचा प्रत्यय वेळोवेळी आला. त्याचा सर्वोच्च बिंदू आबांची गोष्ट आहे. या कथासंग्रहात पारंपरिक बोधकथा किंवा संस्कार कथा याचे स्वरूप नसून परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या, प्रतिकूल अवस्थेत धडपडणाऱ्या, प्रामाणिक, जिद्दी मुलांच्या संघर्षकहाण्या मांडण्याचा प्रयत्न केला. यातील स्कॉलरशिप नावाची कथा वाचून पालकांना रडू आले. प्रतिसाद चांगला मिळाला.

बातम्या आणखी आहेत...