आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहादा तालुक्यातील विसरवाडी-सेंधवा या राष्ट्रीय महामार्गावर प्रकाशा गावालगत असलेल्या कोकण माता मंदिराजवळ ट्रक व मिनी ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले.
रविवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी करत कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. जखमींना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिनी ट्रक (क्र. एमपी ०९ एचएच ५५११) मध्य प्रदेशातून गुजरात राज्यात लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य व धान्य घेऊन जात हाेता. प्रकाशा जवळ पहाटे समोरून गुजरात राज्यातून मध्य प्रदेशकडे जाणारा ट्रक (क्रमांक जीजे ५ बीएक्स ४४८३)ने त्यास समाेरून जोरदार धडक दिली. त्यात मिनीट्रकच्या चालकासह असलेल्या पाच जणांपैकी तीन जागीच ठार झाले तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
अपघात एवढा भीषण होता की कानठळ्या बसवणारा आवाज झाला. त्यात मिनी ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला. मिनी ट्रक ट्रकच्या पुढील भागात घुसला होता. प्रकाशा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच जेसीबी यंत्राच्या साह्याने ट्रकमध्ये अडकलेल्या मिनी ट्रकला बाहेर काढले. या अपघातात हेमराज अंजने (वय ३९), मनोज घाट्या (वय ४२) दाेघे रा.सुरत व भगवान भाई गोविंद पंचुले (वय ४८) रा.गोंदिया (मध्यप्रदेश) हे तिघे जागीच ठार झाले.
येथील ग्रामीण रुग्णालयात डाॅक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना साेपवले. अपघातात गंभीर जखमी झालेले मिनिट्रक चालक गोलूभाई व अनिकेत अंतिम, दाेघे रा.हिरापूर (मध्य प्रदेश) या दाेघा जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले अाहे.
अपघात स्थळी रक्ताचा सडा
अपघात इतका भीषण हाेता की अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. मिनी ट्रकमधील सर्व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. जखमींना मदत करण्यासाठी प्रकाशा पोलिस दूरक्षेत्राचे संदीप खंदारे व रामा वळवी, माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, स्थानिक पत्रकारांसह ग्रामस्थांनी मदत करून रस्त्यावरची वाहतूक सुरळीत सुरू केली. अपघातानंतर ट्रक चालक व क्लिनर दोघेही फरार झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.