आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारांवरील कारवाईची दखल:सहकारमंत्री सावे यांनी थोपटली जिल्हा उपनिबंधक बिडवईंची पाठ; मंत्रालयात झाला गौरव

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ सावकारांनी हडप केलेली तब्बल 96 एकर शेती रावेर, यावल तालुक्यातील पंधरा शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी बुधवारी दिलेत. सावकारांविरुद्ध झालेल्या या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कारवाईची दखल सहकारमंत्री अतुल सावे यांनी घेतली. त्यांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधकांचा मंत्रालयात सत्कार केला. सहकारमंत्र्यांनी पत्र देवून जिल्हा उपनिबंधकांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयीन कामानिमित्त मंत्रालयात गेलेले होते. जळगाव जिल्ह्यात सावकारांवर झालेल्या कारवाईची माहिती मिळताच सहकार मंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली. या कामगिरीचा गौरव होणे आवश्यकच आहे, असे त्यांनी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील सहकार मंत्री सावे यांच्या दालनात जिल्हा उपनिबंधक बिडवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी नानासाहेब कदम,अभिजित पाटील, अतुल सुरेवाड यांच्यासह सहकारमंत्र्यांचे खासगी सचिव खेडेकर उपस्थित होते.

जिल्हा उपनिबंधक पदावरुन महाराष्ट्र सावकारी(नियमन) अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार यावल व रावेर तालुक्यातील पंधरा शेतकऱ्यांना 38 हेक्टर 37 आर (सुमारे 96 एकर) व प्लॉट मोबदल्या पोटी 1 कोटी 85 लाख 35 हजार रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, असे आदेश दिले.

त्रस्त शेतकऱ्यांना आठ सावकारांच्या पाशातून मुक्त केले. तुमचे काम सहकार विभागाची प्रतिमा उंचावणारे व सर्व सामान्यांप्रती शासनाची कटीबध्दता दर्शवणारे आहे. तसेच यातून इतर अधिकारी, कर्मचारी यांना निश्चीत प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा सहकारमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यात झालेल्या कारवाईच्या निमित्ताने व्यक्त केली आहे. या आशयाचे पत्र सहकार मंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. चांगल्या कामाची दखल घेतल्याने जिल्हा उपनिबंधकांनी सहकार मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

या कारवाईत सहायक निबंधक व सहकार विभागातील कर्मचाऱ्यांचेही महत्वपूर्ण योगदान आहे. शेतकऱ्यांनीही न डगमगता सावकारांविरुद्ध लढा दिला. लढा देताना काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना व सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय दिल्याचे समाधान असल्याचे जिल्हा उपनिबंधक बिडवई यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...