आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयाेध्यानगर व एमआयडीसी परिसरातून जाणाऱ्या १३२ केव्हीच्या वीजवाहिनीजवळ वाढीव बांधकाम केलेल्या १२ काॅलन्यांमधील २२१ घरांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. गेल्या दाेन महिन्यात झालेल्या घटनांमुळे भविष्यता जीवितहानी टाळण्यासाठी महापारेषण कंपनीने थेट महापालिकेला पत्र पाठवले आहे. अतिउच्च दाब वाहिनीच्या जवळ बांधकामाला परवानगीच देऊ नये तसेच झालेले बांधकाम काढण्याची सूचना करण्यात आली आहे.
शहरातील अयाेध्यानगर, सद्गुरूनगर, रामचंद्रनगर, लीला पार्क, नारायण पार्क, प्रेमचंदनगर, गीताईनगर, द्वारकानगर तसेच काैतिकनगर, सुधाकरनगर, पंढरपूरनगर या काॅलन्यांची निर्मिती हाेण्यापूर्वी सन १९७७ ते १९७८ दरम्यान १३२ केव्ही क्षमतेची अतिउच्चदाब वाहिनी बांभाेरी व दीपनगरसाठी टाकण्यात आली आहे. या वाहिनीसाठी शहरात सुमारे नऊ टाॅवर उभारण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षात या भागातील विकास व्हायला सुरूवात झाल्यानंतर घरांचे बांधकाम सुरू झाले आहे. अनेक रहिवाशांनी महापालिकेने दिलेल्या मंजुरीपेक्षाही जादा बांधकाम केले आहे.
विशेष म्हणजे अति उच्चदाब वाहिनीपासून किमान तीन मीटरपर्यंत कुठलेही बांधकाम करणे धाेकेदायक असतानाही अनेकांनी गॅलरी, पाेर्च, जीना, कंपाउंड उभारले आहेत. काही ठिकाणी थेट वाहिनीच्या खालीच टपऱ्या उभारल्या आहेत. दाेन महिन्यांपूर्वी तीन जणांचा संपर्क आल्याने त्यांना दुखापत झाली हाेती. पुन्हा माेठी घटना हाेवून जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही असे महापारेषण कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. महापारेषणकडून काही घटनांचा संदर्भ देत रहिवाशांना त्यांना अतिउच्चदाब वाहिनीमुळे हाेणाऱ्या धाेक्याची कल्पना दिली आहे. वाहिनीच्याजवळ गेल्यामुळे हानी हाेवू शकते या संदर्भात २२१ रहिवाशांना नाेटीस (सूचनापत्र) दिले आहेत. परंतु, त्यानंतरही रहिवाशांनी १३२ केव्ही काॅरीडाेअरमधील बांधकाम कायम ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.