आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘मी वाचलेले पुस्तक’ उपक्रमाने वाढली आकलन क्षमता, ए.टी.झांबरे शाळेने राबवला उपक्रम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आवडीचे पुस्तक आठवडाभर वाचण्याची संधी

कोरोनामुळे तब्बल दोन वर्ष सर्व शाळा बंद होत्या. या काळात लेखनासह विद्यार्थ्यांचे वाचनदेखील पूर्णतः बंद झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कमी झाली होती. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांत या समस्या प्रामुख्याने दिसून आल्याने शहरातील ए. टी. झांबरे शाळेने वाचन व लिखाण वाढवण्यासाठी “मी वाचलेले पुस्तक’ हा उपक्रम सुरु केला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला आवडेल ते पुस्तक आठवडाभर वाचायचे आणि त्यातून आपल्याला नेमके काय समजले ते वहीत लिहून काढायचे हे सुरु केल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली.

कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना वाचन व लिखाणाची अडचण येत असल्याची अनेकांची ओरड आहे. या पार्श्वभूमीवर झांबरे विद्यालयात तासभर वाचन करण्याचा हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. प्रत्येक वर्गाला एक तास वाचनासाठी दिला जातो. या तासाभरात सुरुवातीला शिक्षक मुलांना पुस्तके आणून द्यायचे.

मात्र आता विद्यार्थी स्वतः ग्रंथालयात जाऊन आपल्याला आवडेल ते पुस्तक घेऊन त्याचे वाचन करत आहे. संपूर्ण पुस्तकाचे वाचन झाल्यानंतर त्यातून नेमकी काय माहिती मिळाली? याबाबत वहीत लिखाण करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढत आहे. सोबतच वाचन व लिखाणाची सवय जडली आहे. याचा पुढे नियमित अभ्यासासाठी देखील उपयोग होईल.

प्रत्येक शाळेत उपक्रम राबवा
शाळेतील विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबवताना सकारात्मक बदल दिसून आले. विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा वाचनाची आवड निर्माण झाली आहे. प्रत्येक घरात व शाळेत हा उपक्रम राबवल्यास मुलांना वाचनाची गोडी निर्माण होईल. प्रणिता झांबरे, मुख्याध्यापिका

वैज्ञानिकांची मिळाली माहिती

या उपक्रमाद्वारे मला विविध प्रकारच्या वैज्ञानिकांची माहिती मिळाली आहे. अभ्यासासोबतच नवीन माहिती मिळाल्याने खूप छान वाटले. ज्ञानात भर पडली. मी ‘राईट ब्रदर्स’ हे पुस्तक वाचून त्यावर अभिप्राय लिहिला आहे. जास्वंदी कुलकर्णी, विद्यार्थिनी

इतिहासकालीन वाचन केले
मला इतिहासाबद्दल जाणून घेण्याची आवड आहे. ‘संभाजी राजे’ हे पुस्तक वाचले. यातून मला इतिहासकालीन माहिती मिळाली. पुस्तकाची रचना देखील उत्तम असल्याने वाचताना जिज्ञासा अधिकाधिक वाढत होती. नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम आहे. त्यात सातत्य असावे. कृष्णगिरी गोसावी, विद्यार्थी

बातम्या आणखी आहेत...