आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात जगभरात भीतीचे सावट होते. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. या काळात वैद्यकीय क्षेत्राने केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टाळण्यात यश आले आहे. त्यामुळेच आता वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व वाढले आहे. या क्षेत्रात नोकरी, व्यवसायाच्या जास्त संधी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील बी फार्मसी, एम. फार्मसीच्या महाविद्यालयांत परराज्यातील विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.
प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी वाट पाहून या क्षेत्राकडे कल वाढवल्याचे समोर येते आहे. बी.फार्मसी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिला व दुसरा कॅप राउंड पूर्ण झाल्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही फेऱ्यांमध्ये संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी शेवटचा कॅप राउंड घेतला जाताे आहे.
रिक्त जागांचा तपशील जाहीर झाल्यानंतर ३० डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. सोमवारी निवड यादी जाहीर झाली. यंदा जळगाव जिल्ह्यात १२ महाविद्यालयात ९६६ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आहे. उशिरा प्रवेश प्रक्रिया होऊनही विद्यार्थी संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शहरात यंदा राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेतल्याचे महाविद्यालयांनी सांगितले. निवड यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ५ जानेवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग व प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन मिळण्यासाठी महाविद्यालयांत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पहिल्या व दुसऱ्या फेरीनंतर ७५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे.तर आता शेवटच्या फेरीनंतर प्रवेशाचा टक्का किती वाढतो याचे चित्र तिसऱ्या कॅप राउंडनंतर स्पष्ट होईल. पहिल्या कॅप राउंडमध्ये शंभर टक्के जागा वाटप होऊनही ७० टक्के विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॅप राउंडसाठी बेटरमेंटचा पर्याय निवडण्याला पसंती दिली हाेती.
डी.फार्मसीच्या तीन फेऱ्या पूर्ण
डी.फार्मसीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. रिक्त जागांसाठी संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यंदा डी.फार्मसीच्या जळगाव जिल्ह्यात २० महाविद्यालयात १३८० जागा होत्या.
१९ डिसेंबरपासून महाविद्यालय सुरू झाले असून २० मे पर्यंत सुरू राहणार आहे. फार्मसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असल्याचे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील औषध निर्माणशास्त्र विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. प्रशांत अरगडे यांनी सांगितले.
१० जानेवारीपर्यंत प्रवेश : बी.फार्मसीसाठी सर्व कॅप राउंड व संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटची मुदत १० जानेवारी देण्यात आली आहे. ११ जानेवारी रोजी महाविद्यालयांना सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची माहिती ऑनलाइन सादर करावी लागणार आहे.डी.फार्मसीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. रिक्त जागांसाठी संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.