आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडीपीडीसीच्या निधीतून सार्वजनिक ठिकाणी उभे राहणारे प्रकल्प समाजासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यात राजकारणाच्या पलिकडे जावून समाजाभिमुख काम करण्याचा प्रयत्न असून विद्यापीठाच्या सबस्टेशनची क्षमता दुप्पट झाल्यानंतर याच क्षमतेचा आणखी एक सौर उर्जा प्रकल्प डीपीडीसीमधून मंजूर केला जाईल, असे आश्वासन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डीपीडीसीच्या निधीतून पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. शनिवारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रकल्प उभारणीस प्रारंभ झाला. यावेळी अधिसभा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी मंचावर प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार उपस्थित होते. प्रा. किशोर पवार यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचे व्यवस्थापक अनंत अग्निहोत्री यांचेही स्वागत करण्यात आले. जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, प्रा. जे.बी. नाईक तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल, प्रभारी वित्त व लेखाधिकारी श्री. एस.आर. गोहिल उपस्थित होते.
वसतिगृहाचे प्रस्ताव मार्गी लावणार
डीपीडीसीच्या निधीतून सार्वजनिक ठिकाणी उभे राहणारे प्रकल्प समाजासाठी फायदेशीर ठरणारे असून विद्यापीठासारख्या शिक्षणाच्या मंदिरात सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी हातभार लागत असल्याचा खूप मोठा आनंद आहे. भविष्यातही विद्यापीठाच्या विविध विकास प्रश्नांवर कायम सहकार्य राहील. सिव्हील हॉस्पिटल आणि विद्यापीठ या दोन संस्थामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यापीठाचे दोन वसतिगृहांचे शासन दरबारी असलेले प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
एक तृतीयांश विजेची होणार बचत
या प्रकल्पामुळे एक तृतीयांश विजेची बचत होणार आहे. डीपीडीसीमधून विद्यापीठाला दहा हायमास्क लँप द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. राज्यशासन, विद्यापीठाची सर्व प्राधिकरणे एकत्र येवून विद्यापीठाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा.डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांनी दिली.
असा आहे प्रकल्प
जळगाव जिल्हा नियोजन व विकास समितीने या 650 किलोवॅट सौर उर्जा प्रकल्पासाठी 3 कोटी 66 लाख 71 हजार 960 रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (मेडा) ही या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.