आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील साडेसहा लाख आरोपींचा डाटा होणार संगणीकृत:डोळ्यांचे बुबूळही डिजिटल स्वरुपात जतन; जळगावमध्ये प्रणालीचे उदघाटन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्ह्यांचा तपास करताना बेपत्ता आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा कस लागतो. त्यामुळे आता एकदा अटक झालेल्या आरोपींच्या हातांचे ठसे, डोळ्यांचे बुबूळ, फोटो हा डाटा डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येणार आहे. त्यामुळे तो तपासकामात संशयितांच्या मॅचिंगसाठी उपयोगी ठरणार आहे. यासाठीच्या ‘ऑटोमेटेड मल्टीमॉडल बायोमॅट्रीक आयडेंटीफीकेशन सीस्टीम’ म्हणजेच एएमबीआयएस या प्रणालीचे उदघाटन सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते झाले. यात प्रणालीत राज्यातील साडेसहा लाख अटक व शिक्षापात्र आरोपींचा डाटा सेव्ह केला जाणार आहे.

देशातील पहिले राज्य

एएमबीआयएस या प्रणालीत आराेपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, चेहरा, डोळ्याचे बुबूळ हे डिजिटिल स्वरुपात जतन केले जाणार आहे. त्यात मॅचिंगचीही क्षमता आहे. पोलिस ठाणे स्तरावर ही प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ही प्रणाली भविष्यात सीसीटीएनएस, पीआरआयएसएम, सीसीटीव्ही व राष्ट्रीय स्तरावरील एनएएफआयएस या प्रणालींशी जोडण्यात येणार आहे.

आरोपींची ओळख पटणार

पोलिस ठाण्यात अटक आरोपींच्या अंगुली मुद्रा ऑनलाइन नोंदवून घेत त्यांचा पूर्व इतिहास, गुन्हे करण्याची पद्धत अपलोड केली जाईल. या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई करता येणार आहे. पोर्टेबल एएमबीआयएस या प्रणालीच्या माध्यमातून थेट घटनास्थळावरुन काही मिनीटातच गुन्हेगारांची ओळख पटवण्यास मदत होणार आहे. ही सर्व प्रणाली तंत्रज्ञानावर आधारीत असल्यामुळे गती व अचूकता मिळणार आहे. उदघाटनप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, संदीप गावित, पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, विठ्ठल ससे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...