आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभावरून पाणीपुरवठा:पंधरा दिवसांत अमृतपुरवठा वाढणार; आठवडाभरात एकेक भागात होईल चाचणी

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन वर्षांपासून सुरू असलेले अमृत अभियानातील पाणीपुरवठा याेजनेचे काम पुढे सरकत चालले आहे. याेजनेतून यापूर्वीच तीन झाेनमध्ये पुरवठा सुरू आहे. आता नित्यानंदनगर, आकाशवाणी व हेमू कलानी जलकुंभावरून पाणीपुरवठा हाेणार आहे. आठवडाभरात चाचणी पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत तीनही झाेनमध्ये नवीन जलवाहिनीतून पुरवठा सुरू हाेईल.

केंद्र शासनाच्या अमृत अभियानातून जळगाव शहरात नाेव्हेंबर २०१७पासून पाणीपुरवठा याेजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून ही याेजना राबवली जात आहे. २४ महिन्यांत याेजना पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. आता कुठे याेजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या याेजनेंतर्गत ६८३ किलाेमीटर अंतरावर नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तर सात जलकुंभांची उभारणी करण्यात येत आहे. सहा महिन्यांपूर्वीच निमखेडी, पिंप्राळा व सुप्रीम काॅलनी या एक लाख लाेकवस्तीच्या भागात नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित झाेनमध्येही लवकरच पुरवठा केला जाईल, असे सांगितले जात हाेते.

जलवाहिनीचे काम झाल्यावर टाक्यांची जोडणी
औरंगाबाद महामार्गापासून गिरणा टाकीपर्यंत १२०० मि.मी. व्यासाची डीआय पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर जलकुंभाची जाेडणी हाेईल. त्यानंतर डीएसपी चाैक, मेहरूण भागात पाणीपुरवठा सुरू हाेईल. नित्यानंदनगर, आकाशवाणी व हेमू कलानी जलकुंभाची जाेडणी पूर्ण झाली आहे. आठवडाभरात एकेक जलकुंभाची चाचणी घेतली जाणार आहे. पुढच्या पंधरा दिवसांत या जलकुंभांवरून ज्या भागात पुरवठा हाेताे त्या ठिकाणी नवीन याेजनेतून पुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...