आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगावमध्ये न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या दोन कुटुंबांमध्ये लाथा आणि बुक्क्यांनी तुफान हाणामारी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाच्या आवारात हा तमाशा रंगला. हे भांडण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली. या घटनेत विवाहितेचा विनयभंग झाला, तर तिच्या सासूच्या मनगटाचे फ्रॅक्चर झाले. 7 मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी गुरुवारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खावटी मिळाली अन्...
गुजराल पेट्रोल पंप परिसरातील श्रीरत्न कॉलनीत राहणाऱ्या तरुणाचे लग्न उल्हासनगर येथील तरुणीशी झाले आहे. सतत भांडण होत असल्यामुळे हे नवरा-बायको आता विभक्त राहतात. घटस्फोट मिळवण्यासाठी विवाहितेने न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. सध्या त्या विवाहितेला पतीकडून दरमहा पाच हजार रुपयांची खावटी दिली जाते. या प्रकरणी सात जून सुनावणी होती. त्यासाठी दोन्ही कुटुंब बीजे मार्केटमधील न्यायालयात हजर झाले. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर विवाहितेस पाच हजार रुपयांची खावटी मिळाली.
लाथाबुक्क्यांनी मारहाण
दोन्ही कुटुंब न्यायालयाच्या बाहेर पडताच एकमेकांमध्ये वाद सुरू झाले. यात विवाहितेच्या पतीसह सासू व एक मित्र या तिघांनी विवाहितेस शिवीगाळ सुरू केली. पतीसह त्याच्या मित्राने तिचा विनयभंग केला. खावटीचे 5 हजार रुपये व गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून घेतली. विवाहितेच्या वडिलांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशी फिर्याद विवाहितेने दिली आहे.
बेल्टने केली मारहाण
दुसरी फिर्याद विवाहितेच्या सासूने दिली आहे. त्यानुसार, विवाहितेच्या वडिलांनी सुनावणी झाल्यानंतर कमरेचा बेल्ट काढून मारहाण सुरू केली. यात विवाहितेच्या सासूचे मनगट फ्रॅक्चर झाले. तसेच त्याने सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने देखील सासूच्या हातांवर नखांनी ओरबाडले. या प्रकरणी विवाहिता व तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.