आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘डर के आगे जीत है...’ एका जाहिरातीमध्ये ही टॅगलाइन वापरण्यात आली हाेती. मिहीर या नाटकाचा नायक. त्याच्या मनातील भीती, करिअरच्या मागे धावताना हाेत असलेली घुसमट आणि एका क्षणी त्याच्या हातून झालेली चूक आणि त्याबद्दल त्याला जबर मानसिक ताण सहन करावा लागताे. त्याच्या चुकीची किंमत त्याच्या बायकाेला म्हणजे मधूला भाेगावी लागणार असते. तसं ताे ठरवताे देखील. स्वत:च्या अॅड एजन्सीच्या जागेसाठी त्याने स्वप्न पाहिलेली असतात. त्याचा बाॅस त्याच्या या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्याला जाळ्यात आेढताे व बाॅस त्याच्याच बायकाेसाेबतच्या संबंधांचे चित्रण करून मधूला ‘वन नाइट स्टँड’साठी मिहीरला ब्लॅकमेल करताे. मिहीर आणि मधूच्या सहजीवनाची ही कहाणी नाटकाचे लेखक इरफान मुजावर यांनी संवेदनशीलतेने मांडली आहे. नाटक व नायिका मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनाही या जगाची भुरळ नाही पडली तर नवलच. पूर्वार्धात काटकसरीने जीवन जगणारे दुसऱ्या अंकात दाेघेही थाेडेसे उंची आयुष्य जगताना दिसतात. मिहीर हा अस्वस्थ, पटकन चिडणारा पण मनाने तेवढाच सरळ. मधू मात्र मिहीरवर प्रचंड विश्वास असलेली. काेणत्याही परिस्थितीतून आपण मार्ग काढूच हा विश्वास असणारी. आणि म्हणूनच मिहीरने बाॅसकडे जाण्याचे सांगूनही रात्रभर मैत्रिणीकडे राहून, पुन:श्च मिहीरच्या प्रेमावर, सरळपणावर विश्वास दाखवून... अजूनही चांदरात आहे याची पक्की खात्री एकमेकांना देतात आणि पडदा पडताे. दाेनच पात्र असलेली संहिता शब्दबंबाळ हाेण्याची शक्यता अधिक; परंतु लेखकाने अतिशय संयतपणे विषयाची व्याप्ती शब्दांमधून व्यक्त केली आहे. मिहीर आणि मधू या दाेघांच्याही भूमिका भूषण निकम आणि प्रतीक्षा झांबरे माेठ्या हिकमतीने पार पाडतात. प्रतीक्षा झांबरे या गुणी अभिनेत्रीने अतिशय संयमाने आणि ताकदीने मधू उभी केली. मिहीरच्या स्वभावाचे कंगाेरे लक्षात घेऊन त्याने वेळाेवेळी केलेल्या चुका पदरात घेऊन दाेघांचे सहजीवनच महत्त्वाचे आहे आणि ‘मनाने तू माझा आहेस ना?’ ते बाॅस बराेबर जाण्याचे सांगूनही ताे कसं सहन करू शकेल. उद्ध्वस्त हाेईल. अशा अनेक संवेदनशील गाेष्टींचा विचार करून ती निर्णय घेते. हा प्रवास प्रतीक्षाने तरल अभिनयाने दाखवला. भूषण निकम याचा मिहीर देखील उल्लेखनीय. त्याची अस्वस्थता, त्रागा, सरळ वागणे हे माेठ्या तडफेने दाखवण्यात यशस्वी. दिग्दर्शक भावेश साेनार यांनी संहितेवरील पकड सिद्ध केली. माेठ्या कल्पकतेने या दाेघा कलाकारांकडून कामगिरी करवून घेण्यात यशस्वी. आणि एका सशक्त संहितेचे नाट्यरूपांतरण प्रभावी केले. रूपाली गुंगे यांची प्रकाश याेजना दखल घेण्यायाेग्य. नेपथ्य त्यांच्या जीवनमानातील फरक दाखवण्यात यशस्वी. रंगभूषा, वेशभूषा उल्लेखनीय. लाेकेश साेनार यांचे पार्श्वसंगीत प्रवाही आणि प्रभावी. एका सशक्त नाटकाची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली व स्पर्धेचा दर्जा उंचावण्यात ‘अजूनही चांदरात आहे’ यशस्वी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.