आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुसंवर्धन विभागाची 5 वर्षांपूर्वीची भरती प्रक्रिया रद्द:पदभरतीची ऑनलाईन परीक्षा घेणार खासगी कंपनी; प्रश्नप्रत्रिकेसाठी बाल-भारतीचा प्रतिसाद नाही

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सन 2018 मध्ये शासन निर्णय घेण्यात आला. या पदभरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, बालभारती व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने प्रश्नपत्रिका तयार करुन देण्यास प्रतिसाद दिला नाही.

यासह विविध कारणास्तव ही पदभरती तब्बल चार वर्ष झाली नाही. आता पशुसंवर्धन विभागाने ती पदभरतीच रद्द केली आहे. सद्यस्थितीत रिक्त पदांपैकी ८० टक्केच्या मर्यादेत रिक्तपदे ऑनलाईन परीक्षा घेऊन भरण्यास मान्यता दिली असून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस व आयबीपीएस यापैकी एका संस्थेची निवड करण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांना दिले आहेत.

पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क संवर्गातील रिक्तपदे भरण्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन आयुक्त यांच्यामार्फत जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्रयस्थ संस्थेमार्फत पदभरतीची प्रक्रिया सुरुही करण्यात आली होती. अर्जांची छाननी सुरु असताना शासन सेवेतील पदे महापोर्टलव्दारे भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने निर्णय घेतला.

यादरम्यान एसईबीसी आरक्षणही लागू करण्यात आले. सन 2017 मध्ये दिलेल्या 138 पदांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका काढण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात आलेले नव्हते. बालभारती, एमटीएस, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी प्रतिसाद दिला नसल्याचेही आयुक्तांनी शासनाला कळविले होते. सन 2019 च्या जाहीरातीच्या अनुषंगाने महाआयटीने 9 ते 21 डिसेंबर असे परीक्षेचे वेळापत्रकही निश्चीत केले होते. मात्र, परीक्षेचे आयोजन करण्यात आले नाही. नंतर कोवीडमुळे ही परीक्षा झाली नाही. सुधारित आकृतीबंधानुसार गट क संवर्गातील काही पदे रद्द झाली.

त्यानंतर 17जानेवारी 2023 रोजी शासनाने ती जाहीरात व पदभरती रद्द केली. रिक्तपदांपैकी 80 टक्के मर्यादेत पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. ही पदभरती ऑनलाईन परीक्षा पध्दतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी व इन्स्टीट्यूट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शन यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांना दिले आहेत. परीक्षेबाबत कंपनीशी सामंजस्य करारही करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...