आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी किती जाड झालेय ना... मला अजून थोडं बारीक झालं पाहिजे म्हणजे परफेक्ट फिगर वाटेल. मुलगी वयात आली की जसे आरशासमोर उभे राहून होणारे संवाद अगदी कॉमन असतात. त्यामुळेच तर झीरो फिगरची तरुणींमध्ये क्रेझ वाढली असून बारीक होण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने विविध आजार उद्भवत आहे.
परदेशातील मुलींमध्ये दिसून येणाऱ्या अॅनोरेक्सिया या आजाराचे रुग्ण जळगाव जिल्ह्यातही आढळून येण्यास सुरुवात झाल्याने चिंता निर्माण झाली आहे. १०० रुग्णांमधून १० रुग्णांना हा आजार झाल्याचे दिसून येत आहे. कलाकारांकडे बघून सध्या तरुणींमध्ये झीरो फिगरची क्रेझ निर्माण झाली आहे. याकरिता अतिशय अघोरी आणि जीवघेणे प्रयोग केले जात असल्याने त्यांना विविध आजारांची लागण झाल्याचे तज्ज्ञांच्या निरीक्षणात समोर आले आहे. त्यामुळे अॅनोरेक्सिया हा आजार आता जळगाव जिल्ह्यातही फोफावतो आहे.
शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही अतिबारीक म्हणजे सुंदर साइज झीरो वैगरे चुकीच्या संकल्पना रुळायला लागल्यामुळे सौंदर्याची परिमाणे बदलली आहेत. बारीक होण्यासाठी किशोरवयीन मुली आता खाल्लेलं अन्नही मुद्दाम उलटी करून बाहेर काढत असल्याचे प्रकार वाढत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.
चुकीचे डाएट गंभीर
जाडी कमी करण्याच्या हट्टापायी अनेक महिला, विशेषत: तरुणी डाॅक्टरांचा सल्ला न घेता उपाय करत असतात. डाएटच्या नावाखाली उपाशी रहाणे आरोग्याला धोकादायक असून, त्यामुळे किशोरवयातच टीबी, अॅॅनिमिया, हाडांचा ठिसूळपणा, निद्रानाश आदी गंभीर समस्यांना तरुण वयात मुलींना सामोरे जावे लागत आहे. त्यापुढची पायरी आहे क्षुधानाश अर्थात अॅनोरेक्सिया. हा आजार जिल्ह्यात दिसून येत आहे.
असे आहेत विकाराचे दुष्परिणाम
क्षुधानाश शरीराची अशी अवस्था आहे ज्यात शरीरास पोषकद्रव्ये मिळत नाहीत.
शरीराची बांधणीच अशक्त झाल्याने गुंतागुंतही निर्माण होऊ शकते.
डागाळलेली किंवा पिवळ्या रंगाची त्वचा होऊन तिच्यावर बारीक केस येतात.
सतत गोंधळलेपणा किंवा मंदपणा येतो. तसेच स्मरणशक्ती क्षीण होऊन निर्णय क्षमताही कमी होते.
तोंड कोरडे होते, थंडी वाजते, हाडे ठिसूळ होतात, स्नायूंचा ऱ्हास होतो, नैराश्य येते, प्रतिकारशक्ती कमी हाेऊन टीबी हाेऊ शकताे.
किशोरवयीन वयातच गंभीर आजार जडतात
ही आहेत आजाराची लक्षणे
वजन वाढण्याची किंवा जाड होण्याची भीती वाटत राहते. क्षुधानाश झालेल्या व्यक्ती त्यांचे जेवण कमी करतात. खाण्याच्या पद्धतीही विचित्र होत जातात. जेवणाचे छोटे तुकडे करणे किंवा ते ताटामध्ये फिरवणे, हवामान खराब असो धावपळीचा दिवस असो की तब्येत खराब राहो तरीदेखील व्यायाम करणे, लघवी होण्यासाठी गोळ्या घेणे, भूक कमी होण्यासाठी गोळ्या घेणे.
अॅनोरेक्सिया हा एक सायकोसोमॅटिक विकार आहे. यात मुली सतत बारीक होण्याचा विचार करतात. जाड झाल्यास त्यांची चिडचिड होते. शरीराला प्रोटीन्स, कार्बेहायड्रेट्स, फॅट्स, जीवनसत्त्वे मिळत नसल्याने शरीर उपासमार होईपर्यंत अन्नाचा त्याग करत राहते. या आजाराचे १० टक्के रुग्ण आढळतात. - डॉ. अमेय कोतकर, त्वचारोगतज्ज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.