आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगालच्या उपसागरातील ‘असानी’ चक्रीवादळ निवळत असतानाच अंदमान-निकोबार बेट समूहावर नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) दाखल होण्याची शक्यता आहे. त्यास पोषक हवामान तयार झाले आहे. तो दक्षिण अंदमान समुद्र आणि लगत असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे देशात २७ मे रोजी म्हणजे चार दिवस अगोदर मान्सूनचा प्रवेश होणार असल्याचे हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. खासगी संस्था स्कायमेटनेही २६ मे रोजी मान्सून भारतीय भूभागावर पोहोचू शकतो, असे म्हटले आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात ४० व्या वेळेस मान्सून निश्चित तारखेच्या (१ जून) आधीच येणार
स्वतंत्र भारताच्या इतिहासात ४० व्या वेळेस मान्सून निश्चित तारखेच्या (१ जून) आधीच दाखल होईल. इतिहासात केवळ ६ वेळाच मान्सून नियमित तारखेला दाखल झाला आहे.
दरवर्षाचा मान्सूनचा प्रवास
दरवर्षी मान्सून २१ मेपर्यंत अंदमानात, तर १ जूनपर्यंत केरळात येतो. यंदा १५ मे रोजीच तो अंदमान समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे.
गतवर्षी असे होते मार्गक्रमण
गतवर्षी २१ मे रोजी मान्सूनने अंदमानमधील बेटांचा बहुतांश भाग व्यापला होता, तर ३ जून रोजी तो केरळमध्ये दाखल झाला होता.
99% वर्षाव यंदा
-यंदाच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने १४ एप्रिल रोजी जाहीर केला होता.
-या अंदाजामध्ये किमान पाच टक्के कमी-अधिक बदल होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मान्सूनसाठी पूरक ‘ला निना’ ची स्थिती असेल, असेही हवामान खात्याचे अनुमान आहे.
देशभरातील हवामानची सद्य:स्थिती अशी...
बंगालच्या उपसागरातील असानी चक्रीवादळ निवळत असून आंध्रच्या किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्र प्रणाली सक्रिय आहे. ती लवकरच निवळणार आहे. तोपर्यंत आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यामध्ये ढगाळ हवामान राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मान्सूनचा प्रवास : पॅसिफिक समुद्र ते भारत
पॅसिफिक समुद्रातून मान्सूनचा प्रवास फिलिपाइन्स, तैवान, द. चीन समुद्र, मलेशिया, इंडोनेशिया, जावा सुमात्रा, नंतर भारतीय महासागराकडे होतो. तेथून तो अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेकडे १०-१२ दिवस अगोदर येणे अपेक्षित असते व त्यानंतर तो देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळ मध्ये दाखल होतो.'
- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.