आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहाज बुडू लागताच समुद्रात उड्या:ताैक्ते वादळात 8 तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या पाचोऱ्याच्या वैभव पाटीलने कथन केला अनुभव

विनायक दिवटे | पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखरूप घरी परतल्यानंतर वैभव पाटील याचा पाचाेरा तालुका सहकारी (पीटीसी) शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी सत्कार केला. - Divya Marathi
सुखरूप घरी परतल्यानंतर वैभव पाटील याचा पाचाेरा तालुका सहकारी (पीटीसी) शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी सत्कार केला.

ताैक्ते चक्रीवादळात मॅथ्यू असोसिएशन कंपनीचे एक जहाज सापडले. प्रचंड लाटांमुळे जहाजात पाणी शिरल्याने जहाज बुडू लागले. जीव वाचवण्यासाठी जहाजातील ३०० जणांनी समुद्रात उड्या मारल्या. लाइफ जॅकेटच्या अाधाराने तुफान लाटांना सामोरे गेलो. डोळ्यादेखत दोंडाईचा येथील एका मित्रासह अनेक सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. आठ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नौदलाचे जवान आमच्या मदतीला धावून आल्याने सुमारे १८० जण बचावले. त्यात पाचोऱ्याचा वैभव माधवराव पाटील हा एक तरुण आहे. बचावल्याने तो गावी आला. “दिव्य मराठी’ने त्याच्याशी संवाद साधला असता त्याने हा थरारक अनुभव कथन केला.

शहरातील गोविंदनगरी येथील रहिवासी व माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव हा मुंबईच्या मॅथ्यू असोसिएट या कंपनीत फायरमन म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. वैभव म्हणाला, मुंबईपासून सुमद्रात ६० कि.मी. अंतरावर असलेल्या अोएनजीसीच्या हिरा फिल्डवर नोव्हेंबर २०२० पासून रवाना झालो होताे. माझ्यासह अनेक सहकारी या प्रकल्पावर कार्यरत आहेत. काम सुरळीत सुरू होते. चार दिवसांचे काम अपूर्ण होते. ते आटोपून मुंबईत परतणार तत्पूर्वीच ताैक्ते वादळाचा संदेश जहाजाच्या कॅप्टनला मिळाला. जहाज समुद्रातून बाहेर काढण्याच्या सूचना देऊनही अोएनजीसीच्या हिरा फिल्डवरच थांबवले. १५ मेपासूनच वाऱ्याचा वेग वाढला. १६ रोजी वाऱ्यासह लाटाही वाढल्या, रात्री १० पासून ताैक्ते वादळाने रौद्ररूप दाखवयला सुरुवात केली. रात्र कशीबशी काढली. १७ मे रोजी झोपेतून उठलो तर जहाजात पाणी शिरले होते. ते बाहेर फेकण्यासाठी आम्ही जहाजातील सर्व जण भिडलो. मात्र वादळाचा वेग प्रचंड असल्याने लाटांपुढे आमचा निभाव लागला नाही. जहाजाचे सर्वच्या सर्व आठही नांगर लाटांनी उद्ध्वस्त केले. त्यामुळे जहाज प्रचंड हेलकावे खाऊ लागले. अोएनजीसीच्या प्लॅटफॉर्मला जोरात आदळल्याने जहाजाला भगदाड पडले. जहाजात पाणी प्रचंड वेगाने शिरत होते. १७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जहाज समुद्रात बुडू लागले. समुद्रात उड्या घेण्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. नौदलाकडे त्यापूर्वीच कॅप्टनने मदत मागितली होती. ती केव्हा मिळते, हे माहीत नव्हते. जहाज बुडू लागल्याने सायंकाळी ५.४० वाजता खवळलेल्या समुद्रात माझ्यासह ३०० जणांनी उड्या घेतल्या.

लाइफ गार्डच्या साहाय्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र प्रचंड लाटांपुढे निभाव लागणे अशक्य होते. नाकातोंडात पाणी गेल्याने अनेक जण गतप्राण झाले. नौदलाचे जवान आपल्याला वाचवतील या आशेेवर धडपड करीत होतो, शेवटी रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान नौदलाचे जहाज आमच्यापर्यंत पोहोचले. जवानांनी सुरक्षाजाळी फेकली. ती हातात लागली अन् जीव वाचला.

बातम्या आणखी आहेत...