आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीरोग तज्ज्ञ सोसायटी निवडणूक:अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील; सचिव म्हणून डॉ. दीप्ती पायघन तर उपाध्यक्षपदी डॉ. प्रिती दोशी

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव स्त्रीरोग तज्ज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ.सीमा राजेश पाटील यांची तर सचिवपदी डॉ.दीप्ती पायघन यांची निवड करण्यात आली. रविवारी हॉटेल प्रेसिडेंटच्या सभागृहात स्त्रीरोग तज्ज्ञ व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल व आयएमए जळगावचे सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळ्याचे व एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

मावळत्या अध्यक्षा डॉ.सुजाता महाजन व सचिव डॉ.सारिका पाटील यांनी नूतन पदाधिकार्‍यांना पदभार सुपूर्द केला. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ. प्रिती दोशी व कोषाध्यक्ष म्हणून डॉ.स्वप्निल रावेरकर यांची निवड करण्यात आली. डॉ.उल्हास पाटील व डॉ.प्रिती अग्रवाल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ. सीमा पाटील व सचिव डॉ.दिप्ती पायघन यांनी 2022 ते 2024 या त्यांच्या कालावधीत किशोरींच्या आरोग्यासंबंधी, मासिक पाळीविषयी तक्रांरीचे निरसन, शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी या विविध विषयांवर शिबिरे व चर्चासत्रांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला. सूत्रसंचालन डॉ. सुयश नवाल, डॉ. शीतल भोसले, डॉ.प्रिती भारुळे यांनी केले.

चर्चासत्रासह परिसंवाद कार्यक्रम

कार्यक्रमात आयोजित एकदिवसीय चर्चासत्र व परिसंवादात यवतमाळ येथील डॉ. स्नेहा भुयार व डॉ.गिरीश माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील स्त्रीरोग तज्ज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी डॉ.निलेश लाठी, डॉ.भावना चौधरी, डॉ.निलिमा बोरोले, डॉ.पुनम दुसाने, डॉ.स्वप्निल सैतवाल, डॉ.प्रशांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...