आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील २५ ते ३५ वर्षे जुन्या अपार्टमेंटमध्ये एकच नळकनेक्शन देण्याचा निर्णय घेतल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ही खदखद रहिवाशांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून बुधवारी मनपासमोर व्यक्त केली. कनेक्शन बंद केले जाणार नाहीत, ज्याचे नळ कनेक्शन बंद केले आहे ते त्वरित जोडण्यात येतील, असे ठोस आश्वासन महापालिकेने दिले आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे.
अमृत योजनेंतर्गत जळगाव शहरातील जुन्या अपार्टमेंटला नळ कनेक्शन देण्याचा विषय वर्षभरापासून गाजत आहे. जुन्या अपार्टमेंटमध्ये भूमिगत साठवण टाकी करणे शक्य नाही. त्यामुळे एकच कनेक्शन दिल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत. हा प्रश्न गंभीर होत चालल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी रविवारी बैठक बोलावली होती. त्यात २२ रोजी मनपासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अपार्टमेंटमधील रहिवाशांसह महापालिकेत दाखल झाले.
आयुक्त, अभियंता यांच्यात झाली चर्चा
महापालिका आयुक्त गायकवाड यांच्या दालनात शहर अभियंता एम. जी. गिरगावकर, पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. कोणत्याही जुन्या अपार्टमेंटचे नळ कनेक्शन बंद केले जाणार नाहीत, ज्याचे नळ कनेक्शन कापले गेले असेल ते त्वरित जोडण्यात येतील. तसेच सर्व जुन्या अपार्टमेंटला पूर्वीप्रमाणे नळ कनेक्शन देण्याबाबत एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त विद्या गायकवाड यांनी दिले.
या मागण्या;पाण्यापासून कुणालाही वंचित ठेवू नका
नियमानुसार जुन्या अपार्टमेंटला एक नळ कनेक्शन द्यावे अशी शासनाची प्रत दाखवावी.
अमृत अंतर्गत अपार्टमेंटमध्ये पाणी साठवण टाकी बनवण्याचा नियम दाखवा.
अमृत योजनेची नवीन नळजोडणी केल्याशिवाय जुने नळजोडणी तोडण्यात येऊ नये.
ज्यांची जुनी नळजोडणी तोडली व नवीन दिली नाही त्यांना जोडणी मिळावी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.