आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जनादरम्यान महापौर जयश्री महाजनांच्या घरावर हल्ला:43 जणांवर गुन्हा दाखल; महाजन यांचा संताप- पोलिसांनी राजीनामे देऊन घरी बसावे

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती विसर्जनाच्या दिवशी एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर फटाके, गुलाल फेकला. त्यामुळे काही तरुणांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग आल्यामुळे जमावाने थेट दगडफेक सुरू केली. यावेळी झालेल्या तुफान दगडफेकीत तीन जण जखमी झाले.

महिलांवर चाकुने वार करण्याचाही प्रयत्न जमावाने केला. विसर्जनाच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी सकाळी जमावाच्या विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुर्वेश यशवंत महाजन (वय 23, रा. विठ्ठल मंदिर चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

तरुणांना हटकले

महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या जयदुर्गा भवानी क्रिडा मंडळाचे कार्यकर्ते गणपती विसर्जन करून विठ्ठल मंदिर चौकात थांबले होते. याच चौकात महापौर महाजन यांचे घर आहे. दरम्यान, यावेळी एक गाव एक गणपती व श्रीराम मित्र मंडळ असे दोन्ही मंडळ त्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक नेत होते. या मिरवणूकीतील काही तरुण महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकून मोठ्याने आरडाओरड करीत होते. एक तरुण पेटलेले फटाके महाजन यांच्या घरावर फेकत होता. एकंदरीतच या प्रकरामुळे चौकात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यावेळी पुर्वेश महाजन यांच्यासह महेश महाजन, पुष्पक महाजन यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले.

वार करण्याचे प्रयत्न

आमच्या घरात वृद्ध पेशंट आहे. त्यांचे बायपास झाले आहे. त्यामुळे तुम्ही या चौकातून पुढे जा. असे महाजन यांनी जमावाला सांगितले. याचा राग आल्यामुळे योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्वर वाघ, अजय संतोष सांगळे, मयुर बाळकृष्ण सांगळे, दिनेश शिवदास घुगे, किरण उर्फ उली जगदीश नाईक, तेजस उर्फ लंगड्या सुनिल घुगे, महेश शिवदास घुगे, दीपक राजेंद्र नाईक, राहुल विठ्ठल सानप, वैभव किशोर वाघ, महेश उर्फ माही लाड, रामा वासुदेव सानप, मंगेश राजेंद्र नाईक, भावेश उमेश घुगे, भरत चांगदेव आंधळे, किरण शैले, सागर विजय लाड व सोबत असलेल्या 25-30 जणांनी तुफान दगडफेक सुरू केली. काही जणांनी महिलांच्या अंगावर चाकू रोखून वार करण्याचे प्रयत्न केले.

सोनसाखळी लंपास केली

यादरम्यान अॅड. निता भरत महाजन यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी ओढून लंपास केली. दुचाकी, चारचाकींचे नुकसान केले. यानंतर गणेश मूर्ती रस्त्यावरच सोडून पळून गेले. या प्रकारामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत जमाव पांगवला. या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महापौरांचा पोलिसांवर आरोप

या घटनेत पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाला असल्याचे म्हटले आहे. जर शहराच्या प्रथम नागरिकच या ठिकाणी सुरक्षित राहणार नसतील तर सर्व सामान्य जनतेचे काय असा सवाल ही जयश्री महाजन यांनी उपस्थित करून पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे. या घटने संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी राजीनामा देऊन घरी बसावे असा संताप देखील महापौर महाजन यांनी व्यक्त केला.

43 जणांच्या विरोधात गुन्हा

महापौरांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात 43 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. गुलाल उधळण्याच्या कारणावरून काल मध्यरात्रीच्या सुमारास एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आणि घरावर दगडफेक केल्याचा आरोप महापौर जयश्री महाजन यांनी केला होत.

बातम्या आणखी आहेत...