आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जनाला गालबाेट:महापौरांच्या घरावर हल्ला; तिघे गंभीर जखमी

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती विसर्जनाच्या दिवशी एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर फटाके, गुलाल फेकला. त्यामुळे काही तरुणांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग आल्यामुळे जमावाने थेट दगडफेक सुरू केली. यात तीन जण गंभीर जखमी झाले. महिलांवर चाकूने वार करण्याचाही प्रयत्न जमावाने केला. ही घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजता विठ्ठल मंदिर चौकात घडली. या प्रकरणी शनिवारी सकाळी जमावाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वेश यशवंत महाजन (वय २३, रा. विठ्ठल मंदिर चौक) याने पाेलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, त्यांच्या जयदुर्गा भवानी क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते गणपती विसर्जन करून विठ्ठल मंदिर चौकात थांबले होते. याच चौकात महापौर जयश्री महाजन यांचे घर आहे. एक गाव एक गणपती व श्रीराम मित्र मंडळ हे विठ्ठल मंदिर चौकातून विसर्जन मिरवणूक नेत होते. या मिरवणुकीतील काही तरुण महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकून मोठ्याने आरडाओरड करीत होते.

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
मेहरूण गावातून १० ते १२ सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका असतात. गाेंधळ घालणाऱ्या मंडळाकडून दरवर्षी सर्वात शेवटी विसर्जन केले जाते. मंडळाकडून झालेल्या हल्ल्यातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात काेणाच्या डाेक्याला तर काेणाच्या पाेटाला व पायाला मार लागला आहे. शुक्रवारी रात्री उपचारार्थ दाखल केल्यानंतर शनिवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात काही जखमींची तपासणी करण्यात आली.

हल्ल्यासाठी वीज खंडित करण्याचा प्रयत्न
शुक्रवारी रात्री १०.३० वाजता माझ्या घरासमाेरील चाैकात श्रीराम मित्र मंडळाचा गणपती पाेहाेचला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. ढाेल-ताशांचा वृद्धांना त्रास हाेत असल्याने माझ्यासह दाेन्ही दीर घराबाहेर आले. त्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु कार्यकर्ते एेकायला तयार नव्हते. माझ्या सासऱ्यांचे बायपासचे आॅपरेशन झाल्याने त्यांना त्रास हाेण्याची भीती असल्याने माझे दीर पुन्हा समजावण्यास गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत एकीकडून दगडांचा मारादेखील झाल्याने पळापळ सुरू झाली. कार्यकर्त्यांनी वीजपुरवठा खंडित व्हावा म्हणून वीज तारा हलवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही प्रचंड भयभित झालाे असून, लहान मुलांना घरात काेंडून ठेवण्याची वेळ आमच्यावर आल्याचे महापाैर जयश्री महाजन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...