आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनर्थ टळला:‘गस’ सोसायटीत सहकार गटाच्या संचालकांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न, चौघांवर गुन्हा; पोलिसांच्या पथकाने वेळीच धाव घेतल्याने टळला अनर्थ

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रचंड गाजली. गुरुवारी मतदानासाठी येणाऱ्या सहकार गटाच्या संचालकांच्या एका वाहनाला घेराव घालून हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. सुरक्षा कवच तयार करून पोलिसांनी या संचालकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवले. दरम्यान, हल्ल्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याने माजी अध्यक्ष मनाेज पाटील, दिलीप चांगरे, सुनील सूर्यवंशीसह चौघांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोसायटीत कोणत्याही गटाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. सत्ता स्थापनेसाठी दोन गटांना एकत्र येणे अथवा संचालक फोडणे हे दोनच पर्याय होते. त्यात सहकार गटाने ११ संचालकांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसहकार गटातील रवींद्र सोनवणे व ज्ञानेश्वर सोनवणे यांना गळाला लावले,दुसरीकडे अध्यक्ष निवडीच्या पूर्वसंध्येला लोकसहकार व प्रगती गटाने आघाडीची घोषणा केली होती. अकरा संचालकांचे बहुमत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. दरम्यान, बुधवारी रात्री सहकार गटाने ११ संचालक एकत्र असल्याचे पुरावे दिले होते. गुरुवारी दुपारी एक वाजता अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी काही चमत्कार घडेल असे दावे केले जात होते. परंतु, मतदानानंतर लोकसहकार गटात फूट पडल्याचे समोर आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहकार गटाने बाजी मारत सोसायटीवर सत्ता मिळवली. मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न : संचालकांना मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याने रस्त्यावर राडा झाला होता. नवनिर्वाचीत अध्यक्ष उदय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनोज आत्माराम पाटील, दिलीप शिवप्रसाद चांगरे, स्वप्नील गोकुळ पाटील व सुनिल अभिमन सुर्यवंशी या चौघांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी ग.स.ची अध्यक्ष निवडीची प्रक्रीया होती.

या वेळी उदय पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचे संचालक कारने (एमएच १९ सीव्ही २२००) सोसायटीजवळ आले. मनोज पाटील, दिलीप चांगरे, स्वप्नील पाटील व सुनील सुर्यवंशी यांनी चारचाकीवर लाथा-बुक्के मारले. संचालकांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. संचालकांना कारमधून उतरण्यास मज्जाव केला. मतदानापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. या चौघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सुमारे अर्धा तास झालेल्या या गोंधळानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून गर्दी नियंत्रणात आणली. उदय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात दगंलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यातील ग. स. सोसाटीच्या सदस्यांमध्ये चर्चा सुरू असलेल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...