आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ शासकीय सोपस्कार:छत्रपती संभाजीनगर नामांतर होऊनही बस गाड्यांचे फलक अन् उद्घोषणा औरंगाबाद म्हणूनच

प्रतिनिधी | जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद व उस्मानाबाद शहराचे नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव करण्यास केंद्र सरकारने २४ फेब्रुवारीला मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १६ जुलै २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, आठवडा उलटूनही जळगाव स्थानकात येणाऱ्या विविध आगारांचे फलक बदलवण्यात आले नाहीत. तसेच, स्थानकांतील उद्घोषणाही औरंगाबाद असेच देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

सरकारने आदेश काढल्यानंतर औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्याचा शिक्का मोर्तब झाला. मात्र, याची दखल अजूनही विविध आगारांनी घेतल्याचे दिसून येत नाही. बुधवारी सकाळी पावणेदहा वाजता यावल आगाराची बस क्रमांक एमएच- २०, बीएल २४०६ ही यावल-जळगाव-पहुर-सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरमार्गे जाणाऱ्या बसवरही औरंगाबाद हेच नाव दिसून आले. तसेच गाडी बस क्रमांक एमएच- २०, बीएल- २५६५ या छत्रपती संभाजीनगर आगाराच्या बसवरदेखील जळगाव-औरंगाबाद हेच नाव दिसून आले. त्यामुळे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर हे नाव केवळ शासकीय सोपस्कारासाठीच झाले का?, असा सवाल निर्माण होत आहे.

राज्यातील आगारांनी आपल्या फलकांत तसा बदल केल्यास ते प्रवाशांच्या अंगवळणी देखील पडण्यास मदत होईल. तसेच छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसेसची उद्घोषणाही जुन्या नावानेच होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येक आगाराने नावातील तसा बदल करण्याची गरज आहे.

प्रवासी महासंघ व कृती समितीतर्फे बदल

जळगाव आगारात प्रवासी महासंघ व कृती समितीतर्फे वाजत-गाजत एसटीची मिरवणूक काढत जुन्या बोर्डावरील औरंगाबाद नाव काढून त्या जागी छत्रपती संभाजीनगर असे नाव टाकण्यात आले. जळगाव आगारातून दररोज ५ मुक्कामी व तीन इतर अशा एकूण ८ एसटी बसेस छत्रपती संभाजीनगरसाठी जातात. नावातील बदलासाठी जळगाव आगारात प्रवासी महासंघ व कृती समितीतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कामगार संघटनेचे योगराज पाटील, कामगार सेनेचे आर. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवासी महासंघाचे नारायण दुलारे यांनी नवीन फलकाला श्रीफळ फोडला. कार्यक्रमासाठी सोपान सपकाळे, गणेश पाटील, बापू हटकर यांनी सहकार्य केले. गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विनोद पाटील यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...