आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वीच जिल्हा दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढे रस्ता बनवताना झाडे तोडणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान, जामनेर ते नेरी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ७० वर्षे जुनी ३१५ वृक्ष तोडण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी मंत्री गडकरींच्या सूचनांचे पालन करून पुनर्रोपण व नवीन सर्वेक्षण केले तर अजूनही १५०० पेक्षा अधिक कडुनिंबाची वृक्ष वाचवता येणे शक्य आहे.
जामनेर ते नेरी रस्त्याच्या चाैपदरीकरणाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले आहे. गेल्या दाेन-अडीच महिन्यांपासून या मार्गावरील महाकाय असे कडुनिबांचे वृक्ष ताेडण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दाव्यानुसार ३१५ वृक्ष ताेडण्यात आलेली आहेत. या रस्त्यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, सध्या ७ मीटर असलेला डांबरी रस्ता २०.७ मीटर एवढा रुंद केला जाणार आहे. रस्त्याच्या २४ मीटर क्षेत्रातील वृक्ष तोडली जात आहेत. जामनेर शहरापासून पळासखेडे गावाच्या पुलापर्यंत ३१५पेक्षा अधिक मोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत. दरम्यान, ही वृक्ष वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा राऊळ-गिरासे यांनी सांगितले. तसे झाल्यास ७० वर्षे जुने १५०० वृक्ष वाचून पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे.
उन्हाळ्यातही रस्त्यावर सावली
जळगाव जिल्ह्यात रस्त्याच्या दुतर्फा जुनी दाट झाडी असलेल्या रस्त्यापैकी जामनेर-नेरी हा प्रमुख मार्ग आहे. कडुनिंबाची ७० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी आहेत. त्यांची दाट सावली रस्त्यावर पडल्याने तापत्या उन्हातही संपूर्ण रस्त्यावर झाडांची शीतल छाया अनुभवायला मिळते.
पुनर्राेपण, नव्याने सर्वेक्षणासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी वृक्षांचे पुन्हा सर्वेक्षण करावे. कंत्राटदाराने अनावश्यक झाडे तोडू नये यासाठी या विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. महामार्गावर नवीन झाडे लावण्यापूर्वीच जुनी झाडे ताेडत आहेत. अनावश्यक झाडांचीही कत्तल केली जात आहे. हे थांबवून उर्वरित १५०० झाडांपैकी शक्य असलेली काही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढे येण्याची आजमितीला गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.