आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये बहुजन पुरोगामी संघटनांचा रास्ता रोको:थोर पुरुषांच्या बदनामी विरोधात आंदोलन; मुख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात विद्वेषाचे वातावरण तयार करीत विविध जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. या षडयंत्रा विरोधात शहरातील विविध पुरोगामी संघटनानी मंगळवारी सकाळी बांभोरीसह महामार्गावर दोन वेळा 5 मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. शंभराहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

वाहतूक ठप्प

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून बदनामी करण्याचे षडयंत्र करणाऱ्या राज्यकर्ते व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात हे आंदोलन झाले. बांभोरी पुलावर 20 ते 25 कार्यकर्त्यांनी सकाळी 10.20 वाजता रस्त्यावर येत शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे महार्गावरील वाहतूक सुमारे दहा मिनिटे ठप्प झाली.

पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना ताब्यात घेत बाजूला नेत वाहतूक सुरू केली. मात्र काहीवेळाने पुन्हा आंदोलक रस्त्यावर आले, यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तालुका पोलिस ठाण्यात नेले. दुपारी उशिरापर्यंत त्याना तेथेच बसवून ठेवण्यात आले होते.

नेत्यांना आंदोलनापूर्वीच घेतले ताब्यात

लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, बहुजन जनक्रांती मोर्चाचे मुकूंद सपकाळे यांना रास्ता रोको करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. शिंदे हे शिवरामनगरातील निवासस्थानापासून वाहनातून बसून घरून निघत असतानाच त्यांचे वाहन अडविण्यात आले. यामुळे त्यांनी पोलिस प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला. तासभराने त्यांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमा झाल्याने दोन्ही नेत्यांना अटक करून कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी प्रतिभा शिरसाट, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, निवेदिता ताढे, मंगला पाटील, सचीन सोमवंशी आदी उपस्थित होते.

घोषणाबाजी केली

मंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय, कोश्यारी की हुशारी नही चलेगी, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, या घोषणा यावेळी देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस, शिंदे सरकारचाही निषेध करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसंघर्ष मोर्चा, बहुजन जनक्रांती मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, छावा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, अखिल भारतीय पारधी महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लीकन पॅथरसह अन्य संघटना सहभागी झाल्या.

बातम्या आणखी आहेत...