आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचाळीसगाव येथील हिंदू-मुस्लीम एेक्याचे प्रतीक असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबांचा उरूस फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी संदल मिरवणूक तर ७ फेब्रुवारीला तलवार मिरवणूक निघेल. यावेळी राज्यभरातून भाविक दाखल हाेणार आहे. दर्गाह हजरत पीर मुसा कादरी बाबा यांचा वार्षिक उरुस सोहळा साजरा करण्यासाठी दर्गाह कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
याबाबत मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. उरुसनिमित्त ६ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजेपासून संदल शरीफ (चंदन) नसिरोद्दीन तमिजाेद्दीन यांचे राहते घर गणेश डेअरीमागे, रथ गल्ली येथून सुरुवात होईल. तेथून जुने नपा कार्यालय, सराफ बाजार, आडवा बाजार, अफू गल्ली, टाऊन हॉल, रांजणगाव दरवाजापासून दर्गाह पर्यंत मिरवणूक काढण्यात येईल.
शेकडो वर्षांची परंपरा : सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी बाबांच्या उर्सला ७३२ वर्षे पूर्ण झाली असून यंदाचे हे ७३३ वे वर्ष आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या उर्स यात्रोत्सवाची सुरुवात बामोशी बाबांच्या समाधीच्या स्नानाने होते. गुलाबपाणी, दूध व सुगंधी अत्तराने कबरीचे शाही स्नान केले जाते. दुसऱ्या दिवशी संदल मिरवणूक निघते. ही मिरवणूक वाजत गाजत बाबांच्या समाधी स्थळावर पोहाेचते. तिसऱ्या दिवशी तलवार मिरवणूक निघते. ती उरुसचे आकर्षण आहे. या मिरवणुकीला राज्यभरातून भाविक येत असतात. हिरव्या चुडी चादरीत गुंडाळलेली ही तलवार बँडच्या सुरावटीत व ढोल-ताशांच्या गजरात रात्री ९ वाजता समाधी स्थळी पोहाेचते.
नपा कार्यालयासमाेरुन निघेल तलवारीची मिरवणूक
या उरुस सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पूज्य तलवार मिरवणूक ही आहे. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. ही पूज्य तलवार मिरवणूक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ निघेल. ही मिरवणूक न.पा. कार्यालयमोरील बाळासाहेब देशमुख यांच्या घरापासून निघून टाऊन हॉलमधून दर्ग्यात जाईल.
तीन दिवस पाेलिसांचा असेल चोख बंदोबस्त
८ व ९ फेब्रुवारीच्या उरुस सोहळ्यानिमित्ताने विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांकडून चादरी मिरवणूक काढल्या जातात. त्यामुळे हिंदु-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या उर्सचा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी बंदोबस्त मिळावा, अशी मागणी पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा दर्गाह मस्जिद व कब्रस्तान ट्रस्टचे जमील शेख रहेमान मुजावर, रब्बानी मुजावर, अकील मुजावर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.