आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बारा किलाे काजू-बदामांतून साकारला बाप्पा ; सुकामेवासह नदीत विसर्जित करणार

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विघ्नहर्ता गणरायाची विविध रूपे साकारण्याची दरवर्षी स्पर्धा लागते. यंदा जळगावात शाडूमातीची साडेतीन फूट उंच मूर्ती साकारून तिच्यावर नऊ हजारांचे बदाम काजू चिकटवण्यात आले. मध्य प्रदेशातील खेतिया येथील मंडळाने या मूर्तीची आॅर्डर देऊन ती साेमवारी प्रतिष्ठापनेसाठी नेली.

शहरात आकाशवाणी चाैकात मूर्तिकार रामपाल बंगाली हे गेल्या अठरा वर्षांपासून गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतात. दरवर्षी किमान पाच वेगळ्या मूर्ती ते बनवतात. यंदा त्यांनी शाडू व गंगा नदीकाठावरील मातीपासून साडेतीन फूट उंचीची मूर्ती साकारली. त्यासाठी ५० किलाे बांबूचे तुकडे, ५० किलाे गवत, ५० किलाे माती असे साहित्य त्यांना लागले. त्यानंतर या साकारलेल्या मातीच्या मूर्तीवर सुकामेवाचे आवरण देण्याचे खेतिया येथील मंडळाने सुचवले. त्यानुसार या मूर्तीवर बदाम, काजू लावण्यात आले. त्याचा खर्च मात्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला.रामपाल यांनी गेल्या दाेन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने नारळ, साबुदाण्याचा बाप्पा साकारला हाेता. दरवर्षी वेगळी थीम देऊन मूर्ती साकारणे हेच या मंडळाचे वैशिष्ट्ये आहे. तसेच एकदा साकारलेली मूर्ती दुसऱ्यांदा तशी न साकारणे असा संकल्प मूर्तिकार रामपाल यांचा असताे.

मूर्ती पाहण्यासाठी लाेटली हाेती गर्दी
रामपाल बंगाली यांनी साेमवारी दुपारी ही मूर्ती पूर्ण साकारल्यानंतर ती दुकानाबाहेर ठेवली हाेती. ती पाहण्यासाठी नागरिकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. अनेकांनी या मूर्तीसाेबत सेल्फी घेतली. दुपारी चार वाजता खेतिया येथील गणेश मंडळाने ही मूर्ती वाजत-गाजत नेली. चाैपदरी महामार्गावरून कालिंका माता रस्त्यावरून भुसावळकडे ही मूर्ती नेली जात असताना अनेक ठिकाणी गर्दी झाली.

बातम्या आणखी आहेत...