आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:B.E.रोजगार! राज्यात 62% अभियंते बेराेजगार; विद्यार्थी संख्या घटल्याने 50% जागा रिक्त

​​​​​​​धनश्री बागूल | जळगाव2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन वर्षांतच 43 महाविद्यालयांना लागले कुलूप

राज्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकरीपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात केवळ ३८% विद्यार्थ्यांनाच नाेकरी मिळू शकली, ६२% अभियंते बेराेजगार आहेत. परिणामी अभियांत्रिकीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. यंदा राज्यातील ७७ महाविद्यालयांवर अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम कायमचे बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. विशेष म्हणजे, यातील ३४ महाविद्यालये मुंबई आणि पुण्यातील आहेत.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नाेकरी आणि अपेक्षित पगार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा कल वैद्यकीय, विधी, सनदी लेखापाल अशा शाखांसह विविध अभ्यासक्रमांकडे आहे. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत ५०% जागा रिक्तच राहत आहेत. त्यातही महाविद्यालयांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाइल, सिव्हिल आणि मेकॅनिकल हे कोर्सेस चालवणे अशक्य झाले आहे. विद्यार्थ्यांअभावी ७७ महाविद्यालयांत हे कोर्सेस बंद करावे लागले. यात सर्वाधिक २२ ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रम बंद झाले. त्यापाठोपाठ ऑटोमोबाइल, सिव्हिल व मेकॅनिकल अभ्यासक्रमाचा समावेश आहे. कोअर सेक्टरमध्ये नोकरी असली तरी पॅकेज अत्यंत कमी असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहे.

आयटी आणि कॉम्प्युटर या शाखांनाच सर्वाधिक पसंती

विद्यार्थ्यांची आयटी आणि कॉम्प्युटर या दोन शाखांनाच सर्वाधिक पसंती आहे. राज्यात त्यांची एकही जागा शिल्लक राहत नाही. याउलट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ऑटो मोबाइल, सिव्हिल, मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त राहत आहेत. परिणामी वर्षभरात राज्यातील ७७ महाविद्यालयांत या अभ्यासक्रमाचे कोर्सेस कायमचे बंद केले आहेत. यात ११ शासकीय तर ६६ खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे.

३ वर्षांत ४३ महाविद्यालये झाली बंद

अभियांत्रिकीच्या वाढत्या रिक्त जागा पाहता राज्यात ३ वर्षांत ४३ महाविद्यालयांना कुलूप लागले आहे. आयटीआयकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा तंत्रनिकेतनकडे कल कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परिणामी बंद होणाऱ्या कॉलेजमध्ये तंत्रनिकेतनच्या सर्वाधिक कॉलेजचा समावेश आहे. वर्षभरात ६ कॉलेज बंद झाली आहेत.

२७ महाविद्यालये झाली स्वायत्त

बदलत्या काळानुसार पारंपरिक शिक्षण पद्धती न अवलंबता स्वतःचा अभ्यासक्रम बनवीत विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाचा स्वायत्ततेकडे प्रवास सुरू झाला आहे. परिपूर्ण व्यवस्था असलेली २७ अभियांत्रिकी महाविद्यालये वर्षभरात स्वायत्त झाली आहे. यात ९ शासकीय, तर खासगी १८ कॉलेजचा समावेश आहे.

सर्वाधिक बंद झालेले अभ्यासक्रम :

-इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन : 22 -ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग : 07 -सिव्हिल इंजिनिअरिंग : 06 -मेकॅनिकल इंजिनिअरिंग : 05

रोजगाराच्या संधी कमी असल्याने कल घटला

कोअर सेक्टरमध्ये रोजगार कमी असल्याने आयटी तसेच कॉम्प्युटर क्षेत्राकडे ओढा वाढला आहे. इलेक्ट्रिकलसह सॉफ्टवेअरचा कोर्स केल्यास आयटी क्षेत्रात सहज नोकरी मिळते. त्यामुळे विद्यार्थी रोजगाराच्या दृष्टीने कोर्सेस निवडत आहे. परिणामी काही अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहताहेत.'
- प्राचार्य जी.एम. माळवटकर, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, जळगाव

बातम्या आणखी आहेत...