आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:भेंडवळची पारंपरिक घटमांडणी कोरोनामुळे रद्द; साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित

जळगाव जामोदएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अक्षय्य तृतीयेला शेतीविषयी भाकीत सांगण्याची साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे परंपरेनुसार रविवार, २६ एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारी घटमांडणी रद्द करण्यात आली आहे.  बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे २१ रुग्ण आढळून आले असून या पार्श्वभूमीवर ही घटमांडणी रद्द करण्यात आली असल्याची माहिती चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी दिली. 

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम भेंडवळ येथे साडेतीनशे वर्षांपासून घटमांडणी केली जाते. या घटमांडणीतून पीक, पाणी, राजकारण याविषयीचे भाकीत वर्तवले जाते. घटमांडणीची परंपरा चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केली होती. परिसरातील शेतकरी ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय्य तृतीयेला भेंडवळला येऊन या मांडणीचे भाकीत ऐकत होते. त्यावरून वर्षभरातील शेतीची पेरणी आणि पीक पाण्याचे नियोजन करत असत. 

या भविष्यवाणीत शेतीविषयक, राजकारण, नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस आणि पीकपाणी कसे राहील याबाबत अंदाज वर्तवले जातात, तर पृथ्वीवर येणाऱ्या संकटाचीही माहिती असते. सध्या चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज ही परंपरा चालवत आहेत, परंतु यावर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत आहे. 

महाराष्ट्रभर लॉकडाऊन सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कलम १८८ लागू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात कुठलीही बाधा येऊ नये. भविष्यवाणी ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होऊ नये, यासाठी भेंडवळ येथील पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळ घटमांडणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशी होते घटमांडणी

सायंकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर. घागरीवर पुरी, पापड, सांडई, कुरडई, करंजी, भजे, वडा आदी खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. त्यानंतर रात्रभर या घटामध्ये कोणीही फिरकत नाही. या घटांमध्ये रात्रभरात होणाऱ्या बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयासमयी भविष्यवाणी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...