आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक घोटाळा:‘बीएचआर’च्या कर्जाची सेटलमेंट करणारे 56 मोठे कर्जदार रडारवर; 119 कोटी रुपयांची कर्ज वसुली संशयास्पद - आर्थिक गुन्हे शाखेकडे यादी

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार दिवसांच्या टेहळणीनंतर जितेंद्र पाटील, छगन झाल्टे, राजेश लोढा यांना केली अटक

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेतून घेतलेल्या कर्जाची बेकायदा तडजोड (सेटलमेंट) करणारे ५६ मोठे कर्जदार आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत. या कर्जदारांची यादीच आर्थिक गुन्हे शाखेकडे असून आगामी काळात अनेक कर्जदारांच्या अटकेचे संकेत आहेत. पतसंस्थेची करण्यात आलेली ११९ कोटींची कर्जवसुली संशयास्पद असून त्यामध्ये ठेवी पावत्यांद्वारे सेटलमेंट करणारे अनेक जण अडचणीत येणार आहेत.

तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्या कार्यकाळात ३१ ऑगस्ट २०२०पर्यंत कर्जदारांकडून ११९ कोटींची कर्जवसुली करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी बीएचआरवर छापा टाकला. त्यानंतरच्या तीन महिन्यांची कर्जवसुलीची आकडेवारी एकत्र करण्याचे काम सुरु आहे. ११९ कोटींपैकी रोखीने ४७ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. ३६ कोटी ४० लाख रुपयांच्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यात आल्या आहेत. ‘एनइएफटी’व्दारे हे पैसे देण्यात आले आहेत. ठेवी परत करण्यासाठी ५ हजार, १० हजार व २० हजार असे स्लॅब टाकण्यात आले होते. त्यानुसार २० रक्के रक्कम भरुन तसेच हार्डशीप योजना, वैद्यकीय कारण, ज्येष्ठ नागरिकांना ठेवीच्या रकमा परत देण्यात आलेल्या आहेत.

जयश्री मणियार यांची सहा तास केली चाैकशी
बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पाळधीतून जयश्री शैलेश मणियार (वय ४४) यांना राष्ट्री महामार्ग क्रमांक सहावरील इंद्रप्रस्थ बंगल्यातून सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अटक केली. लागलीच त्यांना पुढील चौकशीसाठी पथकाने पुणे येथे नेल्याची माहिती, धरणगावचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे यांनी दिली. पाळधीतून मणियार यांना ताब्यात घेतल्यानंतर पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली. त्यानंतर त्यांना धरणगाव पोलिस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी सहा तास कसून चौकशी केल्यानंतर पथक त्यांना घेऊन पुण्याला रवाना झाले अाहे.

७१.७० कोटींचे कर्ज पावत्यांद्वारे फेडले; अार्थिक गुन्हे शाखेकडून चाैकशी
एफडी अॅडजेंस्टमेंटच्या स्वरुपात ७१.७० कोटींची कर्जाची वसुली झालेली आहे. शेकडा ३० टक्के दराने एफडी घेतल्याचे प्रकार यामध्ये झालेले आहेत. त्याबाबत ठेवीदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलेले आहे. त्यामुळे पूर्ण पैसे मिळाल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. मात्र, ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवीच्या रकमा परत मिळालेल्या नाहीत. ज्या मोठ्या कर्जदारांनी त्यांच्या कर्जामध्ये एफडींची सरमिसळ केली त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून अटक करण्यात आली आहे.

सेटलमेंट करुन कर्जफेड करणाऱ्या ५६ मोठ्या कर्जदारांची यादी आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. बीएचआरकडून १३ टक्के व्याजदर देण्यात येत होता. त्यामुळे ठेवीदारांनी त्यांच्या कष्टाचा पैसा या मल्टीस्टेट पतसंस्थेत अडकवला. मोठे कर्ज प्रकरणे असल्याने परतावाही चांगला मिळत होता. मात्र, कर्जदारांच्या सेटलमेंटमुळे ११९ कोटी रुपयांची कर्जवसुली होवूनही केवळ ३६ कोटी ४० लाख रुपयांच्या ठेवी ठेवीदारांना परत मिळाल्या आहेत. त्यामुळे सेटलमेंट करून कर्जफेड करणारे मोठे कर्जदारही आता आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत.

भागवत भंगाळेंना भेटायला आमदार भाेळे पाेहाेचले थेट पोलिस ठाण्यात
शहरातील हाॅटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांना बीएचआर प्रकरणात पोलिसांनी अटक करून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती मिळताच शहराचे भाजप आमदार सुरेश भोळे तातडीने पोलिस ठाण्यात जाऊन भंगाळे यांना भेटले. भागवत भंगाळे हे आमदार भोळे यांचे मेहुणे आहेत. भागवत भंगाळे हे भोळे, भंगाळे कुटुंबियांचे राजकिय मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. शिवाय मेहुणे असल्यामुळे आमदार भोळे सुमारे दोन तास जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या बाहेर थांबून होते. मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळेंनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आपल्या काकांना नाश्ता नेऊन दिला. दरम्यान, भंगाळेंची प्रकृती खराब झाल्याचीही चर्चा त्या परिसरात सुरू होती. परंतु, नंतर त्यावर कोणी बोलले नाही.

बातम्या आणखी आहेत...