आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ ते देवळाली पॅसेंजरची वेळ बदलली:चाकरमान्यांची होणार गैरसोय; एक्सप्रेस गाड्याही बनल्या गैरसोयीच्या

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ ते देवळाली ही अप व डाऊन पॅसेंजर सुमारे अडीच वर्षांनंतर १५ सप्टेबरपासून सुरू होते आहे. दरम्यान, कोरोना काळातील रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे देवळालीहुन भुसावळला येणाऱ्या पॅसेंजरची वेळ बदलली आहे. यामुळे नांदगाव, चाळीसगाव, पाचोरासह ग्रामीण भागातील सुमारे पाच हजार नोकरदारांची गैरसोय होणार आहे. या संदर्भात संघटना आक्रमक झाल्या आहेत.

कोरोना काळात ही पॅसेंजर बंद करण्यात आली होती. प्रवासी संघटनांनी वेळोवेळी घेतलेल्या पाठपुराव्याने गाडी पुन्हा सुरू केली जाते आहे. परंतु, देवळालीहुन निघणाऱ्या पॅसेंजरची वेळ दोन तास उशिराने केली आहे. पूर्वी ही गाडी देवळाली येथुन पहाटे 4.45 वाजता निघुन भुसावळला सकाळी 10.15 वाजेपर्यंत पोहोचत होती. त्यामुळे नांदगाव, चाळीसगाव, पाचोरासह ग्रामीण भागातील सुमारे पाच हजार लोक सकाळी जळगाव व भुसावळला पोहोचत होते. म्हणजेच त्यांचे दिवसभराचे काम, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी योग्य वेळ ठरत होती.

आता हीच पॅसेंजर देवळाली येथुन सकाळी 7.30 वाजता सुटून दुपारी 12.15 वाजता भुसावळला पोहोचणार आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग वेळेत कामावर हजर राहु शकणार नाही. पाच हजार लोकांची ही समस्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वीच्याच वेळेवर ही रेल्वेगाडी सुरू ठेवावी अशी मागणी ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुंबईच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अशी माहिती पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

एक्सप्रेस गाड्याही बनल्या गैरसोयीच्या

कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार काही एक्सप्रेस रेल्वेगाड्या देखील जिल्ह्यातील अप-डाऊन करणाऱ्या प्रवासी, नोकरदारांसाठी उपयोगी ठरल्या होत्या. आता त्यात बदल झाल्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस, पठाणकोट, कुशीनगर या रेल्वेगाड्या देखील सध्या गैरसोयीच्या ठरत आहेेत.

ब्लॉकमुळे सामान्य प्रवासी त्रस्त

दरम्यान, गेल्या महिन्यात वर्धा, नागपूर येथे कामाच्या निमित्ताने ब्लॉक घेण्यात आले. यामुळे 24 रेल्वेगाड्या रद्द केल्या. अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवासी त्रासले होते.

बातम्या आणखी आहेत...