आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा दूध संघात आमदार एकनाथ खडसे वगळता सर्वपक्षीय पॅनल करण्यावर ठाम असलेल्या भाजप-शिंदेसेनेकडून शुक्रवारी उमेदवारी अर्जावर हरकती टाळण्यात आल्या. सत्तेचा गैरवापर करून हरकतीत अर्ज बाद ठरवले जाण्याचे आराेप यापूर्वी खडसे गटाकडून झाले हाेते. दरम्यान, भाजपने निवडणुकीत नवीन खेळी खेळत पॅनलसाठी उमेदवारांचे पर्याय असावे म्हणून हरकती घेतल्या नाहीत. मुक्ताईनगरसह काही अपवाद वगळता अन्य मतदारसंघात मविआच्या उमेदवारांनीही हरकती टाळल्या.
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वपक्षीय पॅनलची जबाबदारी उचलली आहे. स्वत: मंदाकिनी खडसेंच्या विराेधात उमेदवारी दाखल करून त्यांनी आव्हान उभे केले आहे. खडसे नकाे असे म्हणत ‘मविआ’तील इतरांना घेण्यासाठी मात्र भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात काेणी दुखावले जावू नये तसेच उमेदवारांचे पर्याय असावेत म्हणून भाजपने या निवडणुकीत हरकती घेणे टाळले. हा पवित्रा पाहता हरकतींसाठी कागदपत्रांसह आलेल्या ‘मविआ’ उमेदवारांनी देखील हरकती घेण्याचे टाळले.
अशा घेतल्या हरकती
मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातील उमेदवार मंदाकिनी खडसे यांनी त्या मतदारसंघात उमेवारी अर्ज भरणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्यांच्यासह उमेदवार रमेश पाटील आणि सुभाष पाटील यांच्याविराेधात देखील त्यांनी लेखी हरकत नाेंदविली. जळगाव तालुका मतदारसंघातील उमेदवार खेमचंद महाजन यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात मंगेश चव्हाणांविराेधात हरकत नाेंदवली.
भडगाव तालुक्यात
डाॅ.संजीव पाटील यांनी संदीपकुमार पाटील यांच्याविराेधात हरकत घेतली तर चाेपडा मतदारसंघात राेहित निकम यांनी इंदिराबाई पाटील आणि रवींद्र पाटील यांच्याविराेधात तर रविंद्र पाटील यांनी राेहित निकम यांच्या अर्जावर हरकत नाेंदवली. या हरकतींवर साेमवारी दिला जाणार आह. विमुक्त जाती- जमाती मतदारसंघात विजय पाटील यांनी अरविंद देशमुख यांच्या अर्जावर हरकत नोंदवली.
सात मतदारसंघात दहा जणांनी नोंदवला आक्षेप
उमेदवारी अर्ज छाननीत मुक्ताईनगर, धरणगाव, चाेपडा, अनुसुचित जाती-जमाती, विमुक्त भटक्या जमाती, रावेर, भडगाव या सात मतदारसंघामध्ये १० उमेदवारांनी प्रतिस्पर्धी १७ उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप नाेंदवले. १७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. त्यात आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, संजय पवार, वाल्मिक पाटील यांच्यासह १७ जणांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या. या हरकतींवर सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी संताेष बिडवाई यांच्या समाेर सुनावणी घेण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.