आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहगर्जना करणारे कुठे गेले:औरंगाबादच्या नामांतरावरुन सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका, म्हणाले -एमआयएमला खुश ठेवण्यासाठीच नामांतर केले जात नाही

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची साद घातल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. एमआयएम युतीला शिवसेनेने स्पष्टपणे नकार दिला असला तरी, राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधात बसलेल्या भाजपात आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. भाजपने तर शिवसेनेत हिंदुत्त्व नसल्याचे म्हटले आहे. तर हिंदुत्वासोबत तडजोड होणार नाही अशी भुमिका शिवसेनेने घेतली आहे. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एमआयएम युती तसेच औरंगाबाद शहराचे नामांतर या मुद्यावरुन पुन्हा एकदा शिवसेनेला धारेवर धरले आहे. एमआयएमला खूश करण्यासाठी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर केले जात नाही. असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केला आहे. जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्या प्रसंगी मुनगंटीवार बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, “एमआयएमला खुश ठेवण्यासाठी आमच्या शेर राजाचे नाव शहराला द्यायला तयार नाहीत. जेव्हा भाजपा आणि शिवसेनेचे सरकार होते, तेव्हा 2015-16 या साली सारे प्रस्ताव तयार करत आणले होते. आता शेवटचा प्रस्ताव मंत्रिमंडळासाठी आहे. पाच वर्षे काय केले असे आम्हाला विचारले जाते. पोस्ट ऑफिसपासून प्रत्येक विभागाची एनओसी घ्यावी लागते. या सर्व एनओसी आम्ही घेऊन टाकल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर या टर्ममध्ये आम्हाला नामांतर करायचे होते. आता कॅबिनेटचा प्रस्ताव विचारार्थ आहे. तुम्ही जर खरेच एमआयएमच्या विरोधात असाल तर संभाजीनगरचा प्रस्ताव करा, या अधिवेशनात मी हा विषय पुन्हा मांडणार आहे.” असे मुनगंटीवार म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करता!

'संभाजीनगर करण्याची सिंहगर्जना करणारे कुठे गेले. 1988 मध्ये बाळासाहेबांनी सांगितलेलं की, हे माझे वचन आहे. कुठे गेले ते वचन? शरजील उस्मानी येतो हिंदू हे सडकी लोकं आहेत असे म्हणतो कुठे गेले हे सगळे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात अतिशय नीच शब्दांचा उपयोग होतो जो सामान्य कोणीही बुद्धीवादी व्यक्ती वापरणार नाही त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही सहन करता.आज देशात 'काश्मीर फाईल्स'बद्दल मी स्वत: 92 आमदारांचे हस्ताक्षर करुन स्टेट जीएसटीमध्ये सूट द्यावी अशी मागणी केली होती. तुम्ही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावता.'

'एकदा काँग्रेसच्या नेत्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर जय म्हणायला सांगा. जे घाणेरडे पुस्तक लिहले आहे त्याच्यावर बंदी टाकायला आणि देशाची माफी मागायला सांगा. तुम्ही नवाब मलिकाच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेत नाही का? नवाब मलिक मंत्री नसेल तर राज्याची साडेबारा कोटी जनता काय उपाशी झोपणार आहे? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभेची सत्ता आणण्यासाठी 24 तास पावसात भिजा'

'आघाडी तोडण्यासाठी आम्हाला कधीच प्रयत्न करण्याची गरज नव्हती. जनतेने आम्हाला निवडून दिले. 2 कोटी 30 लाख मते आम्हाला दिली. 161 आमदार आमचे निवडून आले. पण बेईमानी झाली. त्यामुळे इतिहास साक्षीदार आहे. असे बेईमानी करणारे असे बेईमान लोक आपण पाहिले आहेत. जनतेने निवडून दिले होते. काँग्रेसला झटका 44, राष्ट्रवादीला फटका 54 त्यामुळे शंभरच्या आत होते. शंभरीसुद्धा गाठता आली नाही. आता ते सांगतायेत पावसात भिजले आणि आमची सत्ता आली. मग उद्या लोकसभेची सत्ता आणण्यासाठी 24 तास पावसात भिजा. असा खोचक टोला देखील मुनगंटीवार यांनी शरद पवारांना लगावला आहे.

महाराष्ट्र कशात पुढे आहे ? फक्त गुन्हेगारी, माफियाराज

पुढे मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीवर भाष्य केले आहे. “महाराष्ट्र कशात पुढे आहे ? फक्त गुन्हेगारी, माफियाराज, किराना दुकानात वाईन विकने, यामध्ये पुढे आहे. गोरगरिबांच्या घरी किराना देऊन त्यांचे जीवन फाईन करण्याऐवजी, किराना दुकानात वाईन विकून सरकारची तिजोरी फाईन करण्याचे काम सुरू आहे.” अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...