आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कापूस उत्पादनवाढीच्या प्रयत्नांना लाल्या मुळे खीळ; यंदाही चांगला भाव पण नुकसानीची माेठी भीती

ममुराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षीप्रमाणे यंदाही चांगला भाव मिळण्याच्या आशेने जिल्ह्यातील शेतकरी कापसाचे पीक जीवापाड जोपासताना दिसत आहेत. मात्र, उत्पादनवाढीसाठी कोणतीही कसर न ठेवणाऱ्या या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना लाल्याच्या विकृतीमुळे कोठेतरी खीळ बसली आहे. काही दिवसांपूर्वी हिरवेगार बहरलेले कापसाचे शेत हळूहळू लाल-पिवळे पडू लागल्याने संबंधितांत नुकसानीची भीती सुद्धा निर्माण झाली आहे.

विविध कारणांनी जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घटल्याने भारतात उत्पादित कापसाला गेल्या वर्षी कधी नाही तो सुमारे ८ ते ९ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे किंवा त्यापेक्षा चांगली स्थिती कापूस भावाची राहण्याची चिन्हे हंगाम सुरू होण्यापूर्वीच दिसून आली आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्येही उत्साह संचारला आहे; परंतु कापूस वेचणीला अद्याप महिनाभर अवधी शिल्लक असताना मधेच लाल्याच्या विकृतीने तोंड वर काढल्याने आता सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, फुलपात्या लागण्याच्या तसेच बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत असलेल्या कपाशीची पाने मोठ्या संख्येने लाल-पिवळी पडू लागली आहेत. काही ठिकाणी लाल्यामुळे बाधित झालेल्या कापसाच्या झाडांवरील अपरिपक्व कैऱ्या सुकून तडकण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी काही दिवसांनी नुकसान पातळी आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी उपाययोजनेसाठी धावपळ सुरू केल्याचे दिसून येत आहे.

तज्ज्ञ म्हणतात : लाल्या हा रोग नसून ती एक प्रकारची विकृतीच आहे.
कापसावरील लाल्या हा रोग नसून ती एक प्रकारची विकृती आहे. अशा प्रकारची विकृती अमेरिकन संकरित बी.टी. वाणावर मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पाण्याचा ताण पडणे, जमिनीत वाजवीपेक्षा जास्त पाणी साठणे म्हणजेच जमिनीत वाफसा परिस्थिती नसणे, तापमानातील बदल, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तसेच नत्र व मॅग्नेशियम सारख्या अन्नद्रव्यांचा असमतोल, ह्या प्रमुख कारणामुळे लाल्याची लक्षणे कापसाच्या झाडावर दिसतात. लाल्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पीक लागवडीच्या सुरुवातीपासून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. लागवडीआधी सेंद्रिय खत, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खतांची मात्रा जमिनीत टाकावी. रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा शिफारस केल्याप्रमाणे वापर करावा. रासायनिक खते देताना योग्य वेळी व योग्य पद्धतीने द्यावी. शेतात पाणी साचलेले असल्यास पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्या असे कापूस पैदासकार डाॅ. गिरीश चौधरी व तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डाॅ. संजीव पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...