आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणे रस्ते:तुटलेला ढापा, उखडलेले रस्ते, तुंबलेल्या गटारी, बंद पथदिव्यांमुळे जळगावकरांची दैना

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावमधले पंचशीलनगर अतिशय दाटीवाटीने वसलेय. तुंबलेल्या गटारी, पथदिवे बंद असल्याने गल्लोगल्ली दाटलेला काळोळ यामुळे दुचाकी घेऊन शिरायला कसरत करावी लागते. त्यात अपघाताला निमंत्रण देणारा तुडका ढापा कधी कोणाचा जीव घेईल याचा नेम नाही. पावसाळ्यापूर्वी तरी याची डागडुजी होणार का, असा सवाल शहरवासीय करतायत.

समस्यांच्या गर्तेत

पंचशीलनगर गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत आहे. दाटीवाटीची वसाहत, अनेक भागांत कच्चे रस्ते, तुंबलेल्या गटारींवर डास व माशांची सतत भुणभूण सुरू असते. तर इच्छादेवीकडील रस्त्यावरील तुटका ढापा हा अपघाताला निमंत्रण देणाराय. तीन वर्षांपूर्वी याच नगरात मोठी आग लागली होती. आता जर अशी काही दुर्घटना घडली तर या तुटक्या ढाप्यामुळे अग्निशमन बंब नगरात प्रवेशदेखील करू शकणार नाही, असे झाल्यास येथे मोठी दुर्घटना घडू शकते.

प्रवेशाला अडचणी

पंचशीलनगरात प्रवेशासाठी गटारीवर सात फुटांचा ढापा तयार करण्यात आलाय. मात्र, हा ढापा चार फूट तुटलेला आहे. त्यामुळे येथून रिक्षा देखील जाऊ शकत नाही. तर दुचाकी काढायला देखील कसरत करावी लागते. या ढाप्यामुळे अनेक जण पडले. त्यामुळे हा तुटका ढापा लवकरात लवकर तयार करण्याची गरज आहे. अन्यथा आगीसारखी घटना घडल्यास येथे अग्निशमनच्या बंबाला देखील प्रवेश मिळणार नाही, असे रहिवासी पंचशीलनगर हाशीम शेख यांनी सांगितले.

मातीचे रस्ते, धुळीचा सामना

पंचशीलनगरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्तेच झालेले नाहीत. नगरात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात अधिक त्रास होतो. नगर खोलगट भागात वसलेले असल्याने व येथील घरे जमिनीलगत असल्याने पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावरील पाणी घरात शिरते. येथे कोणत्याही भागात डांबरीकरण, सिमेंटचेच रस्ते नाही तर साधा मुरूमाचा रस्ता देखील धड नाही, असे रमजान पठाण यांनी सांगितले.

गटारीचे पाणी शिरते घरात

मोनू काकर यांनी सांगितले की, पंचशील नगरात पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळ्यात गटारींचे पाणी घरात शिरते. या परिसरातील गटारींची साफसफाई नियमित होत नसल्याने या गटारींच्या पाण्याला दुर्गंधी पसरली आहे. या गटारींची सफाई झाली नाही. तर येणाऱ्या पावाळ्यात मोठी बिकट स्थिती होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...