आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचैतन्यनगरातील चित्रप्रभा अपार्टमेंटमधील एका घराला बनावट चावीच्या मदतीने उघडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा १ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एका नातेवाइकानेच ही चोरी केल्याची खळबळजनक बाब समोर आली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कल्पना अनिल कुलकर्णी (वय ५४) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. त्यांच्या जावयाच्या मोठ्या भावाचा शालक मनोज प्रकाश कुलकर्णी (रा. अमळनेर) याने चोरी केल्याचे उघड झाले आहे. कल्पना कुलकर्णी या एकट्या राहतात. त्यांची मुलगी भावना आणि जावई विजय पाठक हे गणेश कॉलनीत राहतात. कल्पना कुळकर्णी ह्या २९ मे ते ६ जून दरम्यान औरंगाबाद येथे बहिणीच्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात बनावट चावीच्या मदतीने घरात प्रवेश करून कपाटातील १ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार आणि त्यांच्या एटीएम कार्डमधून २ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ६ जून रोजी सकाळी कल्पना कुलकर्णी घरी आल्या.
२० जून रोजी सायंकाळी घरात साफसफाई करत असताना कपाटाच्या आतील लॉकर वगैरे चेक केले असता त्यांना त्यांचा तीन तोळ्याचा सोन्याचा राणीहार आढळून आला नाही. याबाबत मुलगी व जावई यांना देखील विचारपूस केली असता त्यांनादेखील याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. कुलकर्णी यांनी सोमवारी २० जून रोजी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर तपास फिरोज तडवी करीत आहे.
सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे घटना आली उघडकीस
मनोज हा कुलकर्णी यांचे जावई विजय पाठक यांच्या मोठ्या भावाचा शालक आहे. विजय पाठक यांच्यासोबत तो अनेकवेळा कल्पना कुलकर्णी यांच्या घरी गेला होता. यातच काही महिन्यांपूर्वी कुलकर्णी यांच्या घराची एक चावी हरवली होती. ही चावी गुपचूपपणे मनोजने मिळवली होती. कुलकर्णी बाहेरगावी जाताच त्याने घरात चोरी केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर कुलकर्णी यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यात त्या बाहेरगावी असताना मनोज अपार्टमेंटमध्ये येऊन गेल्याचे आढळून आले. याच आधारावर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर मंगळवारी मनोजला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.