आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील सर्वाधिक वाईट रस्ता:गोंधळात गोंधळ इच्छादेवी ते रायसोनी काॅलेज मार्गाची कागदावरही अवहेलना

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरातील सर्वाधिक वाईट रस्ता अशी प्रतिमा तयार झालेला इच्छादेवी मंदिर ते रायसोनी काॅलेज पर्यंतचा चार कि.मी. चा रस्ता कागदावरही अवहेलनाच सहन करीत आला आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असल्याचे समजून ज्या रस्त्यावर काम करायला महापालिका हात वर करीत होती तो रस्ता अजून प्राधिकरणाकडे वर्गच झालेला नाही, ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आता महापालिका त्यावर स्वनिधीतून अडीच कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीला अचानक लागली आहे.

शहरातला असला तरी हा रस्ता पाचोरा शहराकडे जातो. त्यामुळे तो रस्ता महामार्ग विकास प्राधिकरणाने दुरुस्त करायचा, असे ठरले होते. त्यादृष्टीने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडे त्याच्या नवनिर्माणाचा प्रस्तावही पाठवला होता. प्रस्ताव मंजूर होताच त्यावर काम सुरू करण्यात येईल, असे अधिकारी सांगत होते. दुसरीकडे हा आपला रस्ताच नाही असे सांगत शहरातला असला तरी त्याच्या दुरुस्तीबाबत महापालिका जबाबदारी झटकत राहीली. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होतच राहिली. मात्र, नुकत्याच झालेल्या एका संयुक्त बैठकीत हा रस्ता महामार्ग विकास प्राधिकरणाकडे अजून हस्तांतरीतच झालेला नसून तो महापालिकेचाच आहे, ही बाब समोर आली आहे. न्हाईच्या अधिकाऱ्यांनी तसे कागदच महापालिका प्रशासनाला दाखवले. त्यामुळे आता या रस्त्यावर अडीच कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे.

‘त्या’ सहा रस्त्यांत हाेता याचाही समावेश
राज्य शासनाच्या चार मे २०१७च्या देशानुसार महापालिका हद्दीतून जाणारे अवर्गीकृत केलेले सहा रस्ते पुन्हा वर्गीकृत केले. या रस्त्यांचा ताबा देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्याचे त्यात म्हटले आहे. त्यात इच्छादेवी ते मानेवाडी फाटा या रस्त्याचाही समावेश आहे. परंतु त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या चार किमी रस्त्याचे हस्तांतरण झाले नसल्याचा लेखी दावा केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटते आहे.

अडीच कोटींचे अंदाजपत्रक तयार
रस्त्याची मालकी अजुनही महापालिकेकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून शहरातील नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने अता पालिकेनेच रस्त्याच्या कामाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाने इच्छादेवी चाैक ते मानेवाडी रस्ता डांबरीकरणासाठीही २ कोटी ५७ लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. दोन महिन्यात कामाला सुरूवात हाेईल असे सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनीही केले होते मनपाला आवाहन
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘दिव्य मराठी’ने वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला होता. मालकी नसली तरी महापालिकेने हा रस्ता तात्पुरता दुरुस्त करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही केली होती.

बातम्या आणखी आहेत...