आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी जीव मुठीत घेऊन पळाले:रेल्वेस्थानकाबाहेर तासभर गाेंधळ, तणाव

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात चहाच्या हातगाडीवर एक ग्राहक व हाॅकर्स यांच्यात किरकाेळ वाद झाला. थाेड्याच वेळाने त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. त्यात हाॅकी व बेसबाॅलच्या स्टीक, बर्फ फाेडण्याचा धारदार टाेच्या, फायटर, लाेखंडी राॅडचा वापर झाला. या घटनेत एक युवती, तिचा भाऊ व वडिलांनाही मारहाण झाली. जेव्हा हाणामारीला सुरुवात झाली तेव्हा पाेलिसांचे वाहन गस्तीसाठी आले खरे; पण ते खाली न उतरताच निघून गेले. त्यांनी हटकले नाही म्हणून पुन्हा जाेरदार राडा झाला. ही घटना बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० दरम्यान घडली. पाेलिस मात्र अनभिज्ञ आहेत.

रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवेशद्वारात दादागिरी करून अनधिकृतपणे हाॅकर्सच्या गाड्या रात्रभर लावलेल्या असतात. तेथे चहा, नाष्टा, सिगारेट पिण्यासाठी तरुण येतात. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गायकवाड नावाचा एक तरुण येथे एका चहाच्या हातगाडीवर गेला हाेता.

त्याचा चहा विक्रेत्याशी वाद झाला. या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. विक्रेत्याने मारहाण केल्यानंतर त्या तरुणाने त्याच्या वडिलांना फाेन करून बाेलावले. त्याचे वडील मुलीसह या ठिकाणी पाेहाेचले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता विक्रेत्याने त्यांनाही बेदम मारहाण केली. यात संबंधित तरुणाच्या बहिणीलाही मारहाण करण्यात आली. उपस्थित जमावाने मध्यस्थी करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी हाॅकी, बेसबाॅलची स्टीक, लाेखंडी राॅड व धारदार शस्त्रही बाहेर काढले.सुमारे तासभर चाललेल्या या राड्याची माहिती पाेलिसांना मिळाल्यानंतर उशिराने पाेलिसांच्या तीन व्हॅन एकाचवेळी या ठिकाणी आल्या. त्यापूर्वी वाद सुरू असताना एक पाेलिस व्हॅन आली हाेती. त्यावेळी पाेलिस गाडीतून खाली न उतरता केवळ सायरन वाजवून राऊंडची आैपचारिकता पूर्ण करून निघून गेले हाेते.

तिघांना मारहाण, काच फाेडली : तिघांना या घटनेत माराहाण करण्यात आली. त्यात एका तीनचाकी वाहनाची काच फुटली. दुचाकी फेकून देण्यात आल्या. हातगाड्या उलथवल्या गेल्या. त्यानंतर इथे उभ्या असलेल्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन पळून जावे लागले.

इतका माेठा राडा हाेऊनही या प्रकरणी पाेलिसांच्या दप्तरी कुठल्याही प्रकारची नाेंद करण्यात आलेली नाही हे विशेष. जाेरदार गाेंधळ हाेत असताना हाकेच्या अंतरावर असलेले लाेहमार्ग पाेलिसांचे पथक किंवा शहर पाेलिसांचे गस्ती पथक कसे काय डाेळेझाक करू शकतात? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला

सीसीटीव्हीचा उपयाेग शून्य
रेल्वेस्थानक परिसरात हाणामाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिक्षा थांब्याजवळ पाेलिस चाैकीवर सीसीटीव्ही लावले आहेत. या कॅमेऱ्यांवर नजर ठेवण्याचे काम शहर पाेलिस ठाणे व नियंत्रण कक्षातर्फे करणे अपेक्षित आहे. असे असताना इथे तासभर तणाव निर्माण झालेला असताना पाेलिस अनभिज्ञ कसे? असा प्रश्न उपस्थित हाेताे आहे.

बातम्या आणखी आहेत...