आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, शिक्षकांना शेकडो सूचना दिल्या. या सर्व सूचना पायदळी तुडवत गुरुवारी दहावीच्या पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला कानळद्यातील आदर्श विद्यायल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांच्या मदतीने सामूहीक कॉपी केली गेली. काॅपीमुक्त अभियानाला केराची टोपली दाखवत ‘कॉपीयुक्त’ अभियानाचा ‘आदर्श’ पॅटर्न या शाळेत पहायला मिळाला. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी तब्बल अडीच तास या शाळेत थांबून या सामूहीक कॉपीचा प्रकार चित्रित केला.
गुरुवारी सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरूवात होताच काही मिनिटात कानळदा गावातील एका तरुणाने कपांउंडची भिंत ओलांडून खिडकीवर चढून पहिल्या माळ्यावर एका वर्गातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका मागून घेतली. मोबाइलमध्ये फोटो काढून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याला परत केली. तत्पूर्वी वर्गांमध्ये शिक्षकांनी देखील काही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना तोंडी सांगितली. काही उत्तरे पेन्सीलीने लिहून दिली. वर्गात गोंधळ घालू नका, जवळ असलेल्या कॉप्यांमधून शांततेत पेपर सोडवण्याच्या सूचना दिल्या गेल्या. ‘वॉटर बाॅय’ असलेल्या तिघांकडून ही माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली. त्यांचे व्हिडीओ देखील उपलब्ध आहेत.
काॅपी समजून खिडकीतून प्रश्नपत्रिकाही फेकली
जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दुपारी १.१५ वाजता शाळेला भेट दिली. शाळेला वळसा घालुन त्यांनी कॉपी पुरवणाऱ्या तरुणांना हाकलून लावले. या वेळी वर्गात गोंधळ उडाला. एका विद्यार्थ्याने कॉपीसह स्वत:ची प्रश्नपत्रिकाही खिडकीतून खाली फेकली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला एकाने प्रश्नपत्रिका खिडकीतून पोहोचवली. पोलिस निरीक्षक कुंभार गेल्यानंतर परिस्थिती पुर्वीसारखीच झाली. दुपारी पेपर संपल्यानंतर बाहेर पडत असलेल्या ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह झळकत असल्याचे दिसले.
जीव धाेक्यात घातला : कानळदा येथील अादर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राच्या खिडकीच्या पडदीवर उभे राहून अाणि जीव धाेक्यात घालून काॅप्या पुरवल्या गेल्या. जीवघेणी कसरत असताना एका विद्यार्थ्याचा पाय घसरला हाेता पण सुदैवाने त्याने ताेल सावरल्याने ताे बचावला. या केंद्राच्या पेपर सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जत्रा भरलेली हाेती. पाेलिसांचा तर धाकच संपल्याचे समाेर अाले.
खिडकीवर चढून गुटखाही पुरवला
एका विद्यार्थ्याला मित्राने खिडकीवर चढून गुटख्याची पुडी दिली. ‘दिव्य मराठी’ने प्रश्नपत्रिका मिळवण्यापासून ते कॉपीचा सर्व प्रकार अनुभवत असताना एकाला संशय येताच त्याने पळ काढला.
काही परीक्षार्थी वारंवार खिडकीत येऊन डोकावत होते. पेपर संपण्याच्या शेवटच्या १५ मिनिटात तर विद्यार्थिनींनी कहर केला. कॉपीने पेपर सोडवल्याचा आनंद त्या खिडकीत उभ्या राहून व्यक्त करत हाेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.