आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी!:मुख्यमंत्री शिंदेचा प्रथमच जळगाव दौरा; मुक्ताईनगरात शिंदेगट करणार शक्तीप्रदर्शन

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच जळगाव दौरा करणार आहेत. मंगळवारी ( 20 सप्टेंबर) रोजी ते जळगावमध्ये असणार आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे,अब्दुल सत्तार व उदय सामंत यांचीही उपस्थिती राहील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे गटाकडून मुक्ताईनगरात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवार, 14 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यंदा वाढदिवसाला अतिशय जंगी पध्दतीत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवार, 14 रोजी मुख्यमंत्री यांचा नियोजीत कार्यक्रम असल्याने हा कार्यक्रम 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे.

खडसेंनी दिला इशारा

मुक्ताईनगर मतदार संघात आमदार एकनाथ खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात शाळांसाठीचा निधीला स्थगिती देण्यात आल्यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील शिक्षण संस्थांसाठी शासनाने 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर केले होते. विकासाच्या कामांना अशा प्रकारे स्थगिती देणे योग्य नाही. निवडणुकीत त्यांना दाखवून देवू, 1 कोटी 20 लाख कुठे जातील, असा इशारा खडसेंनी आमदार पाटील यांना दिलेला आहे. खडसे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क करून आमदार पाटील यांची तक्रार केली होती. तुमचे आमदार आग्रह करतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावर तुमचा आमदार पोरकट असल्याचेही विधान एका जाहीर कार्यक्रमात केले होते.

मुख्यमंत्र्याच्या बोलण्याकडे लक्ष

विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात आमदार एकनाथ खडसे यांनी तहसीलदारांना शिव्या देणारे, महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद असलेली गुंडांची क्लिप सादर केली होती. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी दाखल तक्रारींचा पोलिसांनी तपास केला नाही. त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरुन दबाव टाकण्यात आला. वाळू माफिया, गुन्हे दाखल असलेले, तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या होत्या, अशा गुंडांचे मुख्यमंत्री समर्थन करत असल्यास पोलिस काय तपास करणार, असा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा मुक्ताईनगर शहरात एकनाथ शिंदे येत आहे. मुख्यमंत्री दौऱ्यात काय घोषणा करतात तसेच विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर विधान परिषदेत केलेल्या भाषणाच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात ? याकडे जळगाव जिल्हावासीयांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...